कर्जाच्या ओझ्याला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे.

होय, बेळगावातील वडगावजवळील येळ्ळूर रस्त्यावरील एका शेतातील झाडाला एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. ५६ वर्षीय महावीर जिनप्पा सुटन्नावर असे आत्महत्या केल्याचे नाव असून तो अनगोळचा रहिवासी आहे. ग्रामीण डीवायएसपी गणपती गुडाजी, पोलीस स्थानकाचे सीपीआय श्रीनिवास हंडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महावीरला कर्जाचे ओझे झाले होते. त्याला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
त्याच्या मागे २ मुली, पत्नी असा परिवार आहे. याबाबत आपली मराठीला माहिती देताना महावीरांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, महावीरचा कार अपघात झाला होता. तशातच त्याचे घर पडले होते. ते बांधण्यासाठी त्याला कर्ज झाले होते. त्याला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली आहे. त्याला दुसरे कारण नाही. घराचे कर्ज कसे फेडायचे याचीचिंता त्याला सतावत होती. त्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे असे सांगितले.
दरम्यान या प्रकरणाची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला आहे. घरचा कर्ता पुरुषच हरपल्याने कुटुंबियांच्या आक्रोशाला पारावर राहिलेला नाहीय. काही असले तरी येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन जगले पाहिजे, कर्जाला कंटाळून आत्महत्या करणे हा काही समस्येवरील उपाय नव्हे हेच खरे.


Recent Comments