डी. के. शिवकुमार वगळता सोडून अनेकजण भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याचा नवा राजकीय बॉम्ब भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी आज बेळगावात फोडला.

भाजपला धारवाडमध्ये जिंकण्यासाठी उमेदवार नसल्यानेच त्यांनी बसवराज होरट्टी याना जेडीएसमधून आयात करून उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी नुकताच बेळगावात केला होता. त्यावर आज बेळगावातच भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली. शिवकुमार सोडून आमच्यासोबत कितीजण येतात हे आता शिवकुमार यांनी बघावेच असे आव्हान त्यांनी दिले.
हिजाबवरून बंगळुरात पुन्हा गोंधळ सुरु झाल्याबाबत प्रतिक्रिया देताना कटील म्हणाले, तो कायद्याचा, घटनेचा मुद्दा आहे. न्यायालयाने एक निकाल दिला आहे. त्या निकालानुसार सरकारने नियम बनवले आहेत. त्याचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे कटील यांनी सांगितले.
पाठयपुस्तक सुधारणा समितीच्या अध्यक्षांविरोधात साहित्यिकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केलाय. शिवकुमार यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना कटील म्हणाले, हे खूप चांगले झाले. थोडे दिवस, आणखी एक वर्ष आंदोलन करीत राहणे चांगले. जर इतिहास समजला तर इतिहास निर्माण करता येतो. इतिहास समजून सांगितला पाहिजे. तो सांगण्याचे काम पाठयपुस्तक समिती करत आहे. यापूर्वीही काही फरक झाला होता. सुधारणेसाठी निर्णय झाल्यावर चर्चा, विरोध होणारच असे सांगत पाठयपुस्तक समिती अध्यक्षांच्या नियुक्तीचे कटील यांनी समर्थन केले.
एकंदर राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळ राबविले जाणार आहे, अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये जाणार आहेत असे सूचक विधान कटील यांनी केले आहे. खरेच, कोणकोण काँग्रेस नेते आता कमळाबाईंच्या गोटात दाखल होतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.


Recent Comments