बेळगावच्या राजकारणात महत्वाचे बदल घडविण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांना २०२३च्या निवडणुकीत ठेंगा दाखविण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्याच्या विषयाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पक्ष नेतृत्वाने घेतलेले काही निर्णय याचे संकेत देत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

होय, बेळगाव उत्तरेस आमदार अनिल बेनके सध्या बेळगावच्या राजकारणातले चर्चेतले नेते ठरले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यग्र असलेल्या भाजप नेतृत्वाने बेळगावच्या राजकारणाशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बेळगावच्या राजकारणात काही लक्षणीय बदल घडणार असल्याची बातमी पसरली आहे. हो, पण याचा आणि आ. अनिल बेनके यांचा काय संबंध आहे म्हणता? होय संबंध आहे. २०२३च्या निवडणुकीत भाजप हायकमांड अनिल बेनके यांना घरी बसविण्याच्या विचारात असल्याची अफवा आता पसरली आहे. फ्लो
या संदर्भात भाजप हायकमांडने बेळगावच्या राजकारणात घडलेल्या काही घटनांचा आढावाही घेतल्याचे सांगण्यात येते. २०२३च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी काही विद्यमान आमदारांना उमेदवारी न देण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही काहींना उमेदवारीची मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात भाजप आहे. त्यामुळे काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात येणार आहे. या यादीत अनिल बेनके यांचेही नाव असल्याचे समजते.
काही काळापूर्वी बेळगावातील सीबीटीजवळील टिपू सुलतान रिक्षा स्टॅन्ड हटविण्यावरून झालेल्या वादात मुस्लिम समाजाच्या बाजूने वादग्रस्त विधान आ. अनिल बेनके यांनी केले होते. त्याला संघाने विरोध केल्यावर आ. बेनके यांनी सारवासारव केली होती. तरीही संघ नेत्यांना ही बाब खुपली आहे. त्यामुळे आता बेनके यांना उमेदवारी नको अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे कळते. तशातच मतदार संघातील जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यात आ. बेनके यांना अपयश आल्याचा ठपका ठेवणारा अहवाल पक्षश्रेष्ठींना मिळाला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी स्वतःच बेनके यांना बाजूला सारण्याचा निर्णय घेतल्याची रंगतदार चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.
दरम्यान, या वृत्ताची पुष्टी न करून भाजप नेतृत्वाने शहाणपणाची भूमिका घेतली आहे. तांदळ्यातल्या खड्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतून बेनके यांना दूर काढण्याचा डाव भाजप नेत्यांनी रचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना भाजप महानगर जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे हे त्याचेच संकेत मानले जात आहेत. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून नवा चेहरा पुढे आणण्यात आला तर आश्चर्य वाटायला नको अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राजकारण म्हटले की ते कधी, कसे अन का बदलेल हे सांगता येत नाही. एकीकडे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची सूचना संघाने केल्याने अन दुसरीकडे बेनके यांना पक्षाने महानगर जिल्हाध्यक्ष पद दिल्याने आ. बेनके यांच्या हातातून विधानसभेची उमेदवारी निसटू शकते अशीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. एकंदर विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसे भाजपमध्ये काय बदल होतील हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. पॉलिटिकल ब्युरो, आपली मराठी, बेळगाव


Recent Comments