Belagavi

भाजपच्या निरानी, शहापूर यांचे अर्ज दाखल

Share

 १३ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी भाजप उमेदवार हनुमंत निरानी यांनी वायव्य पदवीधर तर अरुण शहापूर यांनी वायव्य शिक्षक मतदार संघातून बेळगावात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे आघाडीचे नेते उपस्थित होते.

: उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी भाजप उमेदवार हनुमंत निरानी आणि अरुण शहापूर तसेच भाजप नेत्यांनी यांनी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात विघ्नहर्त्या गणेशाची विशेष पूजा करून विजयासाठी साकडे घातले. तेथून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांच्याकडे निरानी आणि शहापूर यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, खा. मंगल अंगडी, अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, आ. अभय पाटील, पी. राजीव, महादेवप्पा यादवाड, दुर्योधन ऐहोळे, महेश कुमठळ्ळी, महांतेश दौडगौडर, अनिल बेनके, माजी मंत्री शशिकांत नाईक, डॉ. विश्वनाथ पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील म्हणाले, निवडणुकीची सर्व पूर्वतयारी आम्ही केली आहे. परवाच म्हैसूरमध्ये भाजप उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. आज बेळगावात अरुण शहापूर आणि हनुमंत निरानी यांचे अर्ज भरले आहेत. विधान परिषदेचा मोठा अनुभव असलेले बसवराज होरट्टी जेडीएसमधून आमच्या पक्षात येऊन पक्षचिन्हावर निवडणूक लढवत आहेत. चारही जागा भाजप नक्की जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकंदर, वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट मुकाबला होत आहे. आता सुजाण मतदार कोणाला साथ देतात यावर या पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे हे निश्चित !

 

 

Tags: