शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले अरुण शहापूर हे योग्य व्यक्ती आहेत. मात्र काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी यांना देण्यात आलेली उमेदवारी अयोग्य असल्याची प्रतिक्रिया मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केली आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्यात विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघासाठी भाजप उमेदवार अरुण शहापूर हे योग्य उमेदवार आहेत तर पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक लढवीत असलेले हनुमंत निरानि यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन आपण करत असल्याचे कत्ती म्हणाले. आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्येच हि प्रमुख लढत होईल. यापूर्वी प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या स्थानिक संस्थांसाठी निवडणूक लढविली आहे.
मात्र यंदा शिक्षक मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविणे योग्य नाही. अरुण शहापूर यांना शिक्षकांच्या अनेक समस्या माहिती आहेत. त्यामुळे या समस्यांचे निराकरण ते करू शकतात. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अरुण शहापूर हेच योग्य उमेदवार असल्याचेही उमेश कत्ती म्हणाले.
शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक वाढविणारे अरुण शहापूर हे शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवत आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते निवडणूक जिंकतील असा आपल्याला विश्वास आहे. राज्यात चार ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित होईल, असेही उमेश कत्ती म्हणाले.
भाजमधील अंतर्गत मतभेदामुळे निवडणुकीवर कोणता परिणाम होईल का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना कत्ती म्हणाले, भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सारेजण एकसंघ आहोत. आणि सर्व मिळूनच आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत आहोत. लखन जारकीहोळी यांच्या पाठिंब्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कत्ती म्हणाले, आपल्या पक्षात आतापर्यत ३७ विधान परिषद सदस्य आहेत. आणखी चार जणांची आता यात वाढ होईल, यामुळे आपल्याला कुणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.
सिध्दरामय्यांनी तांदूळ वितरणासंदर्भात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना उमेश कत्ती म्हणाले, प्रत्येक गरीब कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी ११ किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहेत. सिद्धरामय्या आपले सरकार ४ किलो तांदूळ वितरित करत असल्याचे सांगत आहेत मात्र ४ नाही तर ११ किलो तांदूळ वितरित करण्यात येत असून यापूर्वीच्या सरकारने अशा पद्धतीने कधीच तांदूळ वितरित केले नसल्याचे कत्ती म्हणाले.


Recent Comments