बेळगाव हेस्कॉम कार्यालयातील दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

होय, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद आणि सेक्शन ऑफिसर सिदलिंगप्पा अंगडी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात एका सिव्हिल कंत्राटदाराने आधीच आत्महत्या केली आहे. आता विद्युत कंत्राटदारांनाही गळफास घेऊन आत्महत्या करण्याची वेळ या २ अधिकाऱ्यांमुळे येऊ नये यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, तातडीने ऊर्जा मंत्री सुनीलकुमार यांच्याशी चर्चा करून त्यांची अन्यत्र बदली करावी अशा मागण्या निदर्शक कंत्राटदारांनी यावेळी केल्या. एक सही करण्यासाठी हे दोन्ही अधिकारी ४० ते ५० हजारांची लाच मागतात. असे झाल्यास आम्ही जगायचे तरी कसे असा सवाल करत कंत्राटदारांनी आपली कैफियत आ. अनिल बेनके यांच्यापुढे मांडली. 
यावेळी बोलताना संघाचे जिल्हाध्यक्ष आर. एम. कुंटी म्हणाले, हेस्कॉममधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची येथून बदली केली पाहिजे. पैसे दिले नाहीत तर हे अधिकारी कोणाचीही कामे करत नाहीत. कार्तिका साडीजचे शिफ्टिंग करायचे होते ते यांनी आम्हाला करू दिले नाही. स्वतः डील करून परवानगी दिली आहे. गरिबांच्या घराणं वीजपुरवठा करण्यासाठीही ६० हजार रुपये मागत आहेत. कॉम्प्लेक्सला वीज जोडणीसाठी १ लाख रुपये मागतात. दिले नाहीत तर जोडणी देण्यास विनाकारण विलंब लावतात असा आरोपही त्यांनी केला.
विद्युत कंत्राटदार संघटनेचे सदस्य हरीश पाटील म्हणाले, या संदर्भात आम्ही खासदार मंगल अंगडी याना भेटून निवेदन दिले आहे. हेस्कॉमचे अधिकारी एका मीटर जोडणीसाठी ४०-५० हजार रुपये मागतात. सगळे काम आम्ही करून कंत्राटदारांना कुठे २००-५०० रुपये मिळतात. अधिकारी स्वतः डील करून मीटर जोडणी देत आहेत असा आरोप पाटील यांनी केला. 
कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. अनिल बेनके म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. २ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. याबाबत तातडीने चौकशी करण्याची सूचना देईन, त्याचप्रमाणे ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांच्याशी चर्चा करून कावरे करण्याची मागणी करेन. भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार तुम्ही केल्यावर पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी आपली आहे असे आश्वासन आ. बेनके यांनी कंत्राटदारांना दिले.
एकंदर विद्युत कंत्राटदारांच्या आरोपांमुळे व आंदोलनामुळे हेस्कॉममधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावर आता ऊर्जामंत्री सुनीलकुमार काय पावले उचलतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.


Recent Comments