Belagavi

विधान परिषद मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Share

जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राला आणि स्ट्रॉंग रूमला भेट दिली. शहरातील ज्योती महाविद्यालयात वायव्य पदवीधर आणि शिक्षक तसेच कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मतमोजणी केंद्रच नव्हे, तर निरीक्षक कक्ष, पोस्टल मतदान कक्ष, माहिती कक्ष यासह विविध कक्षांची स्थापना, तक्त्याची अंमलबजावणी आणि मीडिया सेंटरच्या स्थापनेचा आढावा घेतला. विविध कक्षांची पाहणी करून जागेची माहिती घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक मोजणी कक्षात चौदा टेबल बसवावेत. त्याचप्रमाणे स्ट्राँग रुम बसवण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मत मोजणी केंद्रात येणाऱ्यांसाठी सीपीएड मैदानावर पार्किंगची सोय करण्यात येण्यासंदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीवकुमार हुलकाई यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्र व इतर केंद्रे स्थापन करण्याबाबत माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादि, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, उपविभागाधिकारी रवींद्र करलिंगण्णावर, निवडणूक शाखा तहसीलदार सारिका शेट्टी आदी उपस्थित होते.

Tags: