Belagavi

सवदिंना MLC तिकीट ; महेश कुमठळ्ळी यांना विधानसभेची उमेदवारी फिक्स???

Share

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवार महेश कुमठळ्ळी यांना देण्यात येणार कि काय असा सवाल उपस्थित होत आहे.

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अथणी मतदार संघातून इच्छुक असलेल्या लक्ष्मण सवदी यांना भाजप हायकमांडने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली असून २०२३ सालच्या निवडणुकीत आमदार महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर सवदींनी आपल्यामतदार संघाचा त्याग केला होता. याचदरम्यान महेश कुमठळ्ळी यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन आपल्या राजकीय भविष्याची वाट धरली होती. मात्र आता हायकमांडने सवदींना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली असून कुमठळ्ळी यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

१९९९ मध्ये अपक्ष म्हणून अथणी मतदार संघातून सवदींनी निवडणूक लढविली, यावेळी पराभव पत्करावा लागलेल्या सवदींनी २००४ सालची निवडणूक भाजपमधून लढविली. ३२ हजार मतांनी त्यांचा या निवडणुकीत विजय झाला. २००८ मध्ये भाजप उमेदवार म्हणून २१ हजार मतांच्या फरकांनी त्यांनी पुन्हा विजय मिळविला. आणि त्यानंतर २०१३ साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवून २४ हजार मतांच्या फरकांनी बाजी मारली. त्यानंतर २०१८ साली झालेल्या निवडणुकीत २००० मतांच्या फरकांनी सवदींना पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपने त्यांची नियुक्ती राज्य शेतकरी मोर्चा अध्यक्षपदी केली. येडियुरप्पा सरकार काळात उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले असून आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक बदल घटाड असून मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ विस्तार, याही गोष्टी आता प्रतीक्षेत आहेत. मंत्री मंडळ विस्तारादरम्यान लक्ष्मण सवदी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप उपाध्यक्ष स्थान हायकमांडने दिले आणि आता विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करत अथणी मतदार संघासाठी महेश कुमठळ्ळी यांना राखीव ठेवण्यात आल्याची चर्चा जोरदार रंगत आहे.

लखन जारकीहोळी यांनी देखील २०२३ सालची विधानसभेची उमेदवारी महेश कुमठळ्ळी यांनाच मिळेल, अशी भविष्यवाणीही केली आहे. महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील या व्यक्ती भाजपासाठी सुरुवातीपासूनच प्रिया आहेत. या आमदारांमुळेच पक्ष उत्तमरीत्या कार्यरत आहे. अथणी मतदार संघातून महेश कुमठळ्ळी यांना बहुमत आहे. अशा आमदारांना कधीच पक्ष दूर करणार नाही, असे मत लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.

‘ऑपरेशन कमळ’ अंतर्गत भाजप हायकमांडने यापूर्वी अनेक निर्णय घेतले आहेत. अनेक निर्णय यशस्वीही ठरले आहेत. विधान परिषदेची उमेदवारी लक्ष्मण सवदी यांना दिल्यानंतर उर्वरित निर्णय भाजप हायकमांड कसे घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: