बेळगावातील केएलई विद्यापीठ आणि बेळगाव जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर स्विमिंग चॅम्पिअनशिपचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी दिली.
बेळगावात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. व्ही. ए. कोठीवाले म्हणाले, केएलई विद्यापीठ आणि बेळगाव स्वीमर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे राज्यस्तरीय सब ज्युनियर आणि ज्युनियर स्विमिंग चॅम्पियनशिप येत्या 25 ते 29 मे दरम्यान आयोजित केली आहे. उत्तर कर्नाटकात विशेषत: बेळगावमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. चॅम्पियनशिपमध्ये भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. जलतरणपटूंमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक जलतरण संघटनेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेएनएमसी जलतरण तलावामध्ये होणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये अनेक जलतरणपटू भाग घेणार आहेत असे डॉ. कोठीवाले यांनी सांगितले.

यावेळी माहिती देताना प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी म्हणाले, बेळगावात ही स्पर्धा होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. ही स्पर्धा आयोजित करण्यास सहकार्य दिलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांचे आम्ही ऋणी आहोत. या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत सुमारे 800 जलतरणपटू सहभागी होणार आहेत. सर्व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आणि त्यांचे जलतरण कौशल्य पहायची संधी यानिमित्ताने बेळगावकरांना मिळणार आहे. बेळगावच्या जलतरणपटूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून कलघटगी यांनी यावेळी स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत सुधीर कुसाने, इंद्रजीत हलगेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments