Belagavi

बेळगाव बाजारपेठेत टोमॅटो झाला दुर्मिळ ! दर प्रति किलो १०० रुपये

Share

बेळगाव शहरातील बाजारपेठेत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. वरून दिसायला चांगले पण आतून आंबट, किडलेले टोमॅटो पाहून ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात त्यांचे दर ऐकून स्वयंपाकच केलेला बरा अशा प्रतिक्रिया गृहिणींतून व्यक्त करण्यात येत आहेत

होय, गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई गगनाला भिडती आहे. आधी इंधन, गॅस, खाद्यतेले आणि आता भाजीपाल्याच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना हैराण केले आहे. त्यातच आता पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होऊन आवक मंदावली आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव वधारला आहे. याचा सर्वाधिक फटका स्वयंपाक आणि बाजारहाट करणाऱ्या गृहिणींना बसला आहे. बेळगाव बाजारात टोमॅटोचे दर १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपयांना मिळणाऱ्या टोमॅटोचा दर आज अचानक १०० रुपये प्रतिकिलो इतका वधारला आहे. बेळगाव परिसरात सुमारे आठवडाभर झालेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाने टोमॅटो पिकाचे शेतातच कुजून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक मंदावल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटोशिवाय स्वयंपाकही चांगला होत नाही. त्यामुळे तो सोडताही येत नाही आणि चढ्या दरामुळे विकत घेताही येत नाही अशी ग्राहकांची अवस्था झाली आहे.

या संदर्भात इन न्यूज आपली मराठीसोबत बोलताना टोमॅटो व्यापाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत बेळगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी आवक कमी होऊन दर वाढले आहेत. आम्हाला आता व्यापार करणेही कठीण होऊन बसले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना काही ग्राहकांनी वाढलेल्या टोमॅटो दरावरून चांगलीच नाराजी व्यक्त केली. १०० रुपये प्रति किलोवर दर गेल्याने बजेट कोलमडल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले मात्र दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने घर चालविणे कठीण झाले आहे. सरकारने महागाई कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकंदर रोज एक ना एक वस्तूंची दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता चांगलीच मेटाकुटीस आली आहे. तशातच आता स्वयंपाक घरातील अत्यावश्यक टोमॅटोही दरवाढीमुळे चांगलाच लालेलाल झाला आहे.

Tags: