Belagavi

सीमालढ्याला पुन्हा बळ येण्यासाठी समिती नेत्यांनी एकत्र यावं : राजेश क्षीरसागर

Share

मराठी भाषिकांच्या सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा बळ येण्यासाठी समिती नेत्यांनी आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्र यावं असं आवाहन कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे

कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज, शनिवारी बेळगाव शिवसेना शाखेला सदिच्छा भेट दिली. यानिमित्त रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेना भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी राजेश क्षीरसागर यांनी श्री गणेश आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तींचे पूजन केले. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्याहस्ते क्षीरसागर यांचा भगवा फेटा बांधून व भगवी शाल घालून सत्कार करण्यात आला.  यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सीमावासीय मराठी माणसाने प्रदीर्घ काळ मोठा लढा दिला आहे. त्याला शिवसेनेनेही खंबीर साथ दिली आहे. नव्या पिढीतही या प्रश्नाविषयी आस्था आहे. शुभम शेळके यांच्या लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याने याचे प्रत्यंतर आले आहे.  सीमाप्रश्नी स्वराज संघटनेच्या वतीने कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मी कोल्हापूर शहर शिवसेना प्रमुख होतो. अन्यायग्रस्त सीमावासीयांना पाठबळ देण्यासाठी आम्ही या मोर्चात सहभागी झालो होतो असे सांगून कुटुंब म्हणजे कलह असतो. पण सर्वांच्या जिव्हाळ्याच्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्व नेत्यांनी इगो मागे ठेवून एकत्र यावं, सक्रिय होऊन सीमाप्रश्नाचा लढा अधिक तीव्र करावा असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले. बेळगाव शहरामध्ये “धर्मवीर मु. पो. ठाणे” चित्रपट दोन महिने शिवसेनेच्यावतीने दाखविण्यात येणार आहे अशी घोषणा राजेश क्षीरसागर यांनी केली. स्वर्गीय आनंद दिघे यांची बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवरील निष्ठा अत्यंत प्रखर होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांच्यासारखे अनेक निष्ठावान शिवसैनिक निर्माण झाले. त्यांच्या निष्ठेचे प्रदर्शन घडविण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. बेळगावातील मराठी भाषिकांसाठी हा चित्रपट शिवसेनेतर्फे बेळगावात २ महिने मोफत दाखविण्यात येणार आहे असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सीमावासीयांसाठी शिवसेनेने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सीमावासीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेने नेहमीच लढा दिला आहे. मध्यंतरीच्या काळात काहीसे दुर्लक्ष झाले असल्याने सीमावासीय संभ्रमात आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शिवसेनेने सीमावासीयांना धीर, पाठबळ द्यावे असे सुंठकर म्हणाले.

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, राजकुमार बोकडे यांच्यासह शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: