Haveri

पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण द्या : बसव जयमृत्युन्जय स्वामी

Share

लिंगायत पंचमसाली समाजाला २ ए श्रेणीत आरक्षण देण्यात यावे, असा आग्रह करत यापूर्वी ७१२ किलोमीटर बागलकोटपासून बेंगळुरू पर्यंत पदयात्रेचे आयोजन केले होते. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, असे आवाहन कुडलसंगम पंचमसाली पिठाचे बसवजयमृत्युन्जय स्वामी यांनी केले.

हावेरी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. बेळगाव मध्ये झालेल्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला आश्वासन दिले होते. आमदार यत्नाळ आणि विजयानंद काशाप्पांवर यांच्यासह अनेक नेत्यांनी आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले. २४ एप्रिल पर्यंत सरकारला मुदत देण्यात आली होती. परंतु यावेळीही प्रतिसाद देण्यात आला नाही.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाल्याने २३ रोजी आयोजित केलेले आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून येत्या जून महिन्यात आणखी एक सभा घेऊन पुन्हा आंदोलन सुरु करण्यासाठी चर्चा करून तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे बसवजयमृत्युन्जय स्वामी म्हणाले.

यावेळी हरिहर पंचमसाली स्वामीजी विरोधात स्वामींनी टीका केली. आपल्याला आरक्षण हवेच आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे मत ऐकले पाहिजे. समाजातील लहान मुलांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. आईप्रमाणे सरकारने समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा आपला समाज नष्ट होईल, असे बसवजयमृत्युन्जय स्वामी म्हणाले. आरक्षणासंदर्भात सरकारने आपला निर्णय अद्यापही घेतला नाही. यापुढील काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वामींनी दिलाय.

Tags: