Belagavi

आपले नाव बदनाम करण्याचे षडयंत्र! रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांचा आरोप

Share

मी आमदार झाल्यानंतर अनेक शाळा, महाविद्यालये सुरु झाली. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने आपले नाव बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी केलाय.

१६ मे रोजी शाळांना प्रारंभ झाल्यानंतर रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात तंबू घालून शाळा प्रारंभ करण्यात आली,आणि हा विषय अत्यंत चर्चेचा ठरला. यासंदर्भात बेळगावमध्ये भाजप आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक शाळा , महाविद्यालयांची सहकार्य केले. मुदेनूर गावात झालेला प्रकार नंतर माझ्या निदर्शनास आला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी हि बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

सदर शाळेची इमारत कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तालुका आणि जिल्हा पंचायतीकडे अनुदानासाठी मागणी करून २० लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदर शाळेचा शताब्दी महोत्सव करायचा असल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली आहे. आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत तालुक्यातील २२० हुन अधिक शाळा खोल्यांच्या कामकाजासाठी सहकार्य देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे शाळेचे वर्ग तंबूत घेण्यात आले, मात्र याचे खापर माझ्यावर फोडून माझे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप महादेवाप्पा यादवाड यांनी केला.

घडल्या प्रकारचे वृत्त टीव्ही माध्यमांवर प्रसारित झाले त्यावेळी आपण बेंगळुरू येथे होती. याचवेळी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन हि बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. ८ वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याची मागणी आपण त्यांच्याकडे केली असून मागीलवेळी पुरपरीस्थितीमुळे तत्कालीन शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी २३ कोटी अनुदान जाहीर केले होते . १६५ शाळा खोल्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याचप्रमाणे जिल्हा पंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुदानातून २२० हुन अधिक शाळा खोल्या देण्यात आल्या असल्याचे यादवाड म्हणाले.

महादेवाप्पा यादवाड पुढे म्हणाले, आपल्या कारकिर्दीत आपण अनेक शाळा खोल्यांसाठी अनुदान मंजूर करून घेतले आहे. माझ्या आईच्या नावावर शाळेसाठी जमीनही दिली आहे. पदवी महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. १९४४ विद्यार्थी सध्या या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. यापूर्वी १० माध्यमिक शाळा सुरु केल्या. एकाच नाही तर पाच पदवीपूर्व महाविद्यालये सुरु करण्यात आली. आणि हे सर्वकाही यशस्वीरीत्या सुरु आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेले अनेकजण आपल्या तालुक्यात आहेत. मात्र निवडणुकीसाठी आपले नाव बदनाम करण्यासाठी हा सारा प्रकार सुरु असल्याचे महादेवाप्पा यादवाड म्हणाले.

रामदुर्ग तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण बरेच योगदान दिले असून केवळ माझे नाव बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत महादेवाप्पा यादवाड यांनी केलाय.

Tags: