Belagavi

रेडक्रॉसकडून नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत, ६ लाख मास्क केले सुपूर्द

Share

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देऊन बीम्समधील संघटनेच्या खोल्या अबाधित ठेवण्याची विनंती केली.

रेडक्रॉसच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी चेअरमन अशोक बदामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी नितीश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी चेअरमन बदामी यांनी जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी प्रा. डी. एन. मिसाळे यांनी पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देऊन संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी शिष्टमंडळाने रेडक्रॉस संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची माहिती देऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विराप्पा यांच्याकडे बीम्सच्या वैद्यकीय अधीक्षकांनी बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील रेडक्रॉस संस्थेच्या खोल्यांची मागणी केली आहे त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलशी रेडक्रॉस संलग्न आहे. त्यामुळे रेडक्रॉसच्या खोल्या बीम्सला देऊ नयेत अशी विनंती करण्यात आली.

या विनंतीची गांभीर्याने दखल घेण्याबरोबरच जिल्हाधिकारी पाटील यांनी रेडक्रॉस संघटना आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांची आपण लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने  रेडक्रॉसकडे 6 लाख विदेशी फेसमास्क आले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या वितरण करण्यासाठी अशोक बदामी यांनी हे फेसमास्क जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. याप्रसंगी विकास कलघटगी, निवृत्त लेफ्ट. कर्नल डाॅ. विनोदिनी शर्मा, जी. के. शिवयोगीमठ, प्राणेश आदी उपस्थित होते.

Tags: