भाजपच्या सर्व सभा, समारंभांसाठी मला आमंत्रित करण्यात येतेच. मात्र काही कारणामुळे मला येणे शक्य नसते. भाजप पक्ष आणि रमेश जारकीहोळी आपल्याला सन्मान देतात. मात्र काही लहान सहान गोष्टींमुळे व्यत्यय येतो. आगामी निवडणुकीनंतर रमेश जारकीहोळी यांच्याबाबत सर्व काही ठीक होईल, अशी आशा आहे, असे मत अरभावी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपमध्ये काही कमी जास्त प्रमाणात असलेले मतभेद आजच्या बैठकीनंतर संपुष्टात आले आहेत. अरुण शहापूर, हणमंत निराणी यांच्यासाठी संपूर्ण भाजप टीम एकसंघपणे कार्य करून भाजपाला विजयी करेल, असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
कोणत्याही निवडणुकीत उमेदवार पराभूत झाल्यास जारकीहोळी बंधूंचे नाव आघाडीवर असते याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, भाजपमधील दोन उमेदवारांच्या पराभवाचा प्रश्न नाही. यात कुणाचाही दोष नाही. सर्वांचेच भले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या राजकारणातून रमेश जारकीहोळी यांना सरकारने बाहेर ठेवले असून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, प्रल्हाद जोशी, बसवराज बोम्मई, हायकमांड मधील मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असून आगामी निवडणुकीनंतर सर्व काही सुरळीत होईल, असेही भालचंद्र जारकीहोळी म्हणाले.
लखन जारकीहोळी भाजपमध्ये प्रवेश घेतली का? यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, या निवडणुकीत लखन जारकीहोळी भाजपाला पाठिंबा देतील. यापूर्वी अथणी येथे त्यांनी आश्वासन दिले होते. ते नक्कीच पाठिंबा देतील, असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भालचंद्र जारकीहोळी यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करतच भाजपमध्ये दुफळी नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भात आगामी निवडणुकीनंतर सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास देखील भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.


Recent Comments