Banglore

विधान परिषदेच्या माजी सदस्यांची पाऊले भाजपाकडे

Share

राजकारणाचा मोठा अनुभव असलेले बसवराज होरट्टी यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. अधिकृतरीत्या प्रवेश घेतलेल्या बसवराज होरट्टी यांच्या प्रवेशानंतर पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या राजकीय अनुभवाचा पक्षासाठी फायदा होईल, असे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती बसवराज होरट्टी यांनी आज बेंगळुरू मधील आर टी नगर येथील निवासस्थानी जेडीएस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बसवराज होरट्टी यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. शैक्षणिक संघटनांचे संघटन करून त्यांनी समस्या सोडविल्या आहेत. अशा मोठ्या नेत्याने आज भाजपमध्ये प्रवेश घेतला असून होरट्टी यांच्या अनुभवाचा भाजपाला नक्कीच फायदा होईल. होरट्टी यांनी जेडीएस आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा देऊन अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

हुबळी येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून पक्ष प्रवेशाचे काम करण्यात येत आहे. होरट्टी यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला हत्तीचे बळ मिळाले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातील हा सुवर्ण दिवस असून उत्तर कर्नाटकात पक्षाला बळकटी येईल, त्यांच्यासमवेत पक्ष मोठ्या उत्साहाने कार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

याचवेळी बेंगळुरू येथे मुसळधार पावसामुळे जनतेला निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दोन दिवसात बेंगळुरू येथे मुसळधार पाऊस पडत आहे. याचा जनतेला त्रास होत असून अनेक घरात पाणी शिरले आहे. सदर परिसरात आपण भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच योग्य भरपाईही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री आर अशोक, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, मंत्री गोविंद कारजोळ, भाजप राष्ट्रीय प्रधान सचिव सी टी रवी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: