Vijayapura

विजापुरातील प्रसूती रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Share

: विजापूरमधील प्रसूती आणि बालरोग रुग्णालयात सिझेरियन पद्धतीने प्रसूती झालेल्या महिलेचे टाके सुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले असून यानुसार चौकशी आणि तपास सुरु झाला आहे. मात्र यादरम्यान जिल्हा रुग्णालयात हायड्रामा सुरु झाला आहे.

विजापूरमधील प्रसूती रुग्णालयासंदर्भात अनेक तक्रारी पुढे आल्या असून एका सिझेरियन पद्धतीने प्रसूती झालेल्या महिलेचे टाके सुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्माण्णावर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारानंतर सदर महिलेला त्रास होत असून सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमून तीन दिवसांच्या आत चौकशी, तपास करून अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान तपास पथक सकाळीच रुग्णालयातून बाहेर पडले असून डॉक्टरांची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय यासंदर्भात सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात येईल, असे आश्वासन देखील सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिले आहे.

एका बाजूला सहायक आयुक्तांच्या पथकाची कारवाई सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला केपीसीसी महिला घटक सचिव गीतांजली पाटील आणि त्यांच्या पथकाने रुग्णालयात भेट दिली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसमवेत वादावादीचा प्रकार घडला असून यादरम्यान डिस्ट्रिक्ट सर्जन लक्कण्णवर यांनी मध्यस्थी केली. याचवेळी रुग्णालयाच्या बाहेर आम आदमी पक्षानेही आंदोलन करत रुग्णालय प्रशासनाचा निषेध केलाय.

तपास पथकाने प्रत्येक डॉक्टरांची चौकशी केल्याचे सांगण्यात येत असून यासंदर्भातील अहवाल देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची ग्वाहि दिली आहे. तपास पथकाने दिलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: