Banglore

कन्नड अभिनेत्री चेतना राजचा शस्त्रक्रियेवेळी मृत्यू

Share

चरबी कमी करून सुंदर दिसण्याच्या नादात एका कन्नड टीव्ही अभिनेत्रीने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना बेंगळूरमध्ये घडली आहे. २१ वर्षीय चेतना राज या अभिनेत्रीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला आहे

कन्नड छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या चेतना राज चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी बेंगळूरमधील नवरंग सर्कलमधील एका खासगी इस्पितळात दाखल झाली होती. या शस्त्रक्रियेवेळी श्वसन कोशात पाण्याचा अंश उतरल्याने चेतना राजचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. कलर्स कन्नड वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या गीता, दोरेसावी, ओलवीन निलदान या मालिकांत चेतना राजने अभिनय केला होता. अजून प्रदर्शित न झालेल्या हवायामी चित्रपटातही तिने अभिनय केला होता.

बेंगळूर उत्तर तालुक्यातील अब्बीगेरे येथे ती कुटुंबियांसमवेत रहात होती. मुलीच्या मृत्यूबद्दल माहिती देताना तिचे वडील गोविंद राज यांनी सांगितले की, काल सकाळी साडेआठच्या सुमारास चेतना इस्पितळात दाखल झाली होती. आम्हाला हे समजल्यावर आम्ही तेथे पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरु केली होती. सायंकाळी चरबीचा अंश भरल्याने तिला श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्या इस्पितळात आयसीयूसह कोणतीच व्यवस्था चांगली नाही. या आधीही चेतनाने फॅट कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेणार असल्याचं सांगितलं होत.

त्याला आम्ही विरोध केला होता. यावेळी आम्हाला न सांगताच ती शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आली होती. इस्पितळाच्या दुर्लक्षामुळेच माझ्या मुलीला जीव गमवावा लागला. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि पालकांची परवानगी न घेताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असा आरोप त्यांनी केला.

एकंदर, झिरो फिगर करण्याच्या नादात चेतना राज या उदयोन्मुख अभिनेत्रीला जीव गमवावा लागला ही दुर्दुवी घटना म्हणावी लागेल.

 

 

 

Tags: