अथणी तहसील कचेरीवर एसीबीने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यामुळे भ्रष्ट अधिकारी–कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

होय, राज्यभरात अँटी करप्शन ब्युरो अर्थात एसीबीने भ्रष्ट सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातील आपली मोहीम सुरूच ठेवली आहे. काल, सोमवारी दुपारी एसीबी अधिकाऱ्यांनी अथणी तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला.
तहसील कार्यालयावर अचानक छापा टाकून कारवाई करण्यात आली. एसीबीचे डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आर. एफ. देसाई, व्ही. एच. हळ्ळी व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. तहसील कार्यालयातील उपतहसीलदार, शिरस्तेदार, अन्न व नागरी पुरवठा विभाग आदी विभागांची एसीबी अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.
अथणी तहसील कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून, अनेक विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याची तक्रार नागरिकांतून केली जात होती. त्याची दखल घेऊन एसीबीने हा छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी तपास सुरु असून तो संपल्यावरच अधिक माहिती मिळू शकणार आहे.


Recent Comments