मराठा समाजाचे स्वामीजी श्री श्री मंजुनाथ भारती यांच्या गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त बेळगावात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. दक्षिण काशी तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात पुजाअर्चा तसेच शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून गजराजाकडून शिवरायांना पुष्पहार घालून या भव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

थोड्याच वेळात वडगावमधील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात मराठा समाजाचे स्वामीजी श्री श्री मंजुनाथ भारती यांचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हत्तीवरील अंबारीतून मिरवणूक काढण्यात येत आहे. कपिलेश्वर मंदिरात पूजन केल्यानंतर शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुतळ्याला गजराजाकरवी पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ढोल-ताशा, झांज पथकाच्या सहभागाने पारंपरिक वातावरणात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. सकल मराठा समाजाचे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत बेळगावसह पंचक्रोशीतील समस्त मराठा समाजाचे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

भगव्या टोप्या घालून, भगवे ध्वज घेऊन अबालवृद्ध मोठ्या जल्लोषात या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष मिरवणुकीत करण्यात येत आहे. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरून शिवाजी उद्यान, शहापूर खडेबाजार, नाथ पै सर्कल मार्गे भारत नगर, वडगाव, जेल शाळा मार्गे आदर्श विद्यामंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येत आहे. आदर्श विद्यामंदिराच्या प्रांगणात मिरवणुकीचे रूपांतर जाहीर कार्यक्रमात होणार आहे. यावेळी मंजुनाथ भारती स्वामींचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. बेळगाव शहर, तालुका व जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून मराठा समाजबांधवांचे या सोहळ्यासाठी बेळगावात आगमन झाले आहे.


Recent Comments