Belagavi

सकल मराठा समाजतर्फे बेळगावात मंजुनाथ स्वामींची भव्य मिरवणूक

Share

बेंगळुरातील गोसावी मठाचे मराठा समाजाचे स्वामीजी श्री श्री मंजुनाथ भारती यांच्या गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त बेळगावात त्यांची रविवारी भव्य काढण्यात आली. हत्तीघोडे, झांज ढोलपथके, शिवरायांच्या जीवनावर आधारित देखाव्यांचे चित्ररथ असलेल्या या मिरवणुकीने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

 

दक्षिण काशी तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात पुजाअर्चा तसेच शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून गजराजाकडून शिवरायांना पुष्पहार घालून या भव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.  वडगावमधील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात मराठा समाजाचे स्वामीजी श्री श्री मंजुनाथ भारती यांचा गुरुवंदना सोहळा पार पडला. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हत्तीवरील अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली. कपिलेश्वर मंदिरात पूजन केल्यानंतर शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुतळ्याला गजराजाकरवी पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ढोल-ताशा,

झांज पथकाच्या सहभागाने पारंपरिक वातावरणात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. सकल मराठा समाजाचे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत बेळगावसह पंचक्रोशीतील समस्त मराठा समाजाचे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या टोप्या घालून, भगवे ध्वज घेऊन अबालवृद्ध मोठ्या जल्लोषात या मिरवणुकीत सहभागी झाले.  ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष मिरवणुकीत करण्यात आला. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरून शिवाजी उद्यान, शहापूर खडेबाजार, नाथ पै सर्कल मार्गे भारत नगर, वडगाव, जेल शाळा मार्गे आदर्श विद्यामंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. सकल मराठा समाज ही आद्याक्षरे छापलेल्या पांढरे टीशर्ट परिधान केलेले युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

भगवे फेटे घालून युवती व महिलांचा सहभागही लक्षणीय होता. मिरवणुकीत छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे लहान मुलांनी साकारून शिवरायांना मानवंदना दिली. हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा हे मिरवणुकीचे सर्वाधिक आकर्षण ठरले. आदर्श विद्यामंदिराच्या प्रांगणात मिरवणुकीचे रूपांतर जाहीर कार्यक्रमात झाले. यावेळी मंजुनाथ भारती स्वामींचा गुरुवंदना करण्यात आली. बेळगाव शहर, तालुका व जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून मराठा समाजबांधव या सोहळ्यासाठी बेळगावात उपस्थित होते.

 

Tags: