Belagavi

मराठ्यांच्या हक्कांसाठी आता एल्गार ! बेळगावातील गुरुवंदना सोहळ्यात निर्धार

Share

मराठ्यांच्या हक्कांसाठी, समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी एल्गार पुकारण्याचा निर्धार बेळगावात रविवारी झालेल्या सकल मराठा समाजच्या ऐतिहासिक गुरुवंदना कार्यक्रमात करण्यात आला. मराठा समाजाच्या विकासासाठी मराठ्यांनी आता एकत्र आलेच पाहिजे असे आवाहन यावेळी विविध नेत्यांनी केले

 

होय, बेळगावातील वडगावमधील आदर्श विद्यामंदिरच्या मैदानात रविवारी बेंगळूर येथील गोसावी मठाच्या श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींचा ऐतिहासिक भव्यदिव्य गुरुवंदना सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, नूलचे भगवान गिरी महाराज, निपाणीचे निंबाळकर सरकार, कागवाडचे आ. श्रीमंत पाटील, खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर, बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, सोहळ्याचे संयोजक किरण जाधव, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील होते. गुणवंत पाटील यांनी स्वागत केले. अनंत लाड यांनी परिचय करून दिला. त्यानंतर मंजुनाथ भारती स्वामीजी व अन्य मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून गुरुवंदना सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, मराठा समाज आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मी गेली २-३ वर्षे लढा देत आहे. समाजाचा ३ बी मधून २ ए मध्ये समावेश करून विकास साधण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. यासाठी मराठा समाजाने संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

संयोजक किरण जाधव म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने गुरुवंदना कार्यक्रम यशस्वी झाला आहे. पुढील काळात असेच सहकार्य देऊन संघटित होऊन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

आ. अनिल बेनके म्हणाले, पूर्वीच्या काळात मराठा समाज सगळ्या समाजाच्या रक्षणासाठी ढाल-तलवार घेऊन लढला आहे. आता ते दिवस नाहीत. आता आपल्या हक्कांसाठी शिक्षण, लेखणी घेऊन लढण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने मराठा समाज विकास निगमला ५० कोटी निधी दिला आहे. तो अपुरा असून किमान १०० कोटी रुपये निधी द्यावा अशी आमची मागणी आहे. या संदर्भात पक्षभेद विसरून मराठा समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन करतील असे आ. बेनके म्हणाले.

बंगळुरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर आम्ही बेळगावात निषेध केल्यावर आम्हाला तुरुंगात डांबण्यात आले अशी खंत व्यक्त करून रमाकांत कोंडुसकर यांनी, यामागे औरंगजेबाच्या प्रवृत्तीच्या काहींचा हात होता असा आरोप केला. हिंदुत्वाचा बेगडी बुरखा घालून मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या नेत्यांपासून समाजाने सावध रहावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट

एकंदर बेळगावात मराठा समाजाचा प्रथमच न भूतो असा ऐतिहासिक गुरुवंदना कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला. मराठ्यांच्या शक्तिप्रदर्शनासोबतच मराठा समाजाला कोणी हलक्यावर घेऊ नये असा संदेशच जणू यातून देण्यात आला.

Tags: