विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यात शेकडो सायकलपटू आहेत. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करून स्वतः सह विजापूर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या सायकल्पातूनसाठी विजापूरमध्ये वेलोड्रमची निर्मिती करण्यात येत होती मात्र मध्यंतरी हे कामकाज बंद पडले होते. अपूर्ण कामकाजामुळे याठिकाणी अनेक अपघात घडले होते. आता या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र हे कामकाज अत्यंत संथगतीने सुरु असल्याने सायकलपटू नाराजी व्यक्त करत आहेत.

: राज्यात प्रथमच विजापूरमध्ये वेलोड्रमची निर्मिती करण्यात येत होती. मात्र अचानक या कामकाजाला ग्रहण लागले आणि हे कामकाज अर्धवट स्थितीत बंद पडले. शहरातील बाह्य भागात भुतनाळ तलवानजीक ८.१० एकर परिसरात ७.३४ कोटी रुपयांच्या खर्चातून या वेलोड्रम ची निर्मिती करण्यात येत होती. मात्र हे कामकाज अचानक बंद पडले. या बंद पडलेल्या कामकाजामुळे अनेक सायकलपटू नाराजी व्यक्त करत होते. 
७.३४ कोटी रुपयातील एकूण निधीपैकी सध्या ४ कोटी रुपयांच्या खर्चातून काही प्रमाणात कामकाज करण्यात आले आहे. ४ कोटी रुपयांची बिलेही देण्यात आली आहेत. हे चार कोटी रुपये वाया गेल्याचे चित्र दिसत असल्याने याचा आढावा जिल्हाधिकारी पी सुनीलकुमार यांनी घेतला. त्यांनी यासंदर्भात चेन्नई येथे जाऊन तेथील तज्ज्ञ कमिटीची भेट घेऊन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या तज्ज्ञांशी २१ सप्टेंबर २०२१ रोजी चर्चा केली. वेलोड्रम कामकाजातील त्रुटी जाणून घेतल्या. यासंदर्भात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या.
या समितीने दिलेल्या अहवालानुसार आता हे कामकाज पुन्हा सुरु झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तसेच संबंधित अधिकारी आणि अभियंते काम पाहत आहेत. आतापर्यंत हैद्राबाद, पटियाला येथे वेलोड्रम निर्मिती करण्यात आली आहे. पुणे येथे निर्माण करण्यात आलेल्या वेलोड्रम कामकाजात देखील तांत्रिक दोष असल्याकारणाने हे कामकाज बंद स्थितीत आहे. पुण्यातील वेलोड्रम साठीही हीच समिती लक्ष पुरवणार आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार आता विजापुरात देखील वेलोड्रम चे कामकाज पुन्हा सुरु झाले असून हे काम मात्र संथपद्धतीने सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
विजापूर जिल्ह्यात अनेक क्षेत्रांमध्ये ख्याती मिळविलेले मान्यवर आहेत. कला, संस्कृती, शिक्षण यासह क्रीडा विभागात देखील विजापूर जिल्ह्याचे विशेष असे नाव आहे. याच पार्श्वभूमीवर येथील सायकल पटुंसाठी वेलोड्रम ची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हे कामकाज अर्धवट स्थितीत थांबले आणि अनेक सायकलपटूंनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर हे कामकाज पुन्हा एकदा सुरु झाले असून वेलोड्रम चे कामकाज पूर्ण होण्याकडे सायकलपटूंचे लक्ष लागले आहे.


Recent Comments