विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली असून मतदारांना आमिष दाखविणे किंवा आचारसंहितेचा भंग करताना आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले प्रादेशिक आयुक्त आम्लान बिश्वास यांनी दिलाय.

कर्नाटक वायव्य पदवीधर शिक्षण आणि पश्चिम मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यलयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम्लान बिस्वास बोलत होते. या निवडणुकीसाठी १९ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ मे, २७ मे रोजी अर्जाची छाननी, अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ३० मे. १३ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया आणि १५ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती आम्लान आदित्य बिस्वास यांनी दिली.
परवानगीशिवाय निवडणूक प्रचारासाठी कोणतीही जाहीर सभा घेता येणार नाही, परवानगीशिवाय सभा घेतल्यास अशा उमेदवारांना पुढील पदोन्नती नाकारली जाईल, नामनिर्देशन सादर करणाऱ्या उमेदवारासह फक्त पाच जण आणि दोन वाहनांना परवानगी आहे. आचारसंहितेचे पालन केले पाहिजे. प्रत्येक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकाच बूथमध्ये दोन स्वतंत्र मतपेट्या ठेवल्या जातील. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार यादी तयार केली जाईल आणि मतदाराने दिलेला पत्ता नमूद केला जाईल. यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही, असे बिस्वास यांनी स्पष्ट केले. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी पुरेसा अवधी आहे. शेवटच्या तारखेच्या दहा दिवस आधी नामांकनाला परवानगी देण्यात आली आहे, असे आम्लान आदित्य बिस्वास यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलताना म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात एकूण ४१८३६ पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार संघात १३४२२ मतदार आहेत. निवडणूक काळात बॅनर आणि वाहने फिरविण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे अशी माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन्ही निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक मतदान आणि पदवीधर मतदान एकाच मतदान केंद्रावर होणार आहे. मतमोजणी संदर्भात अद्याप प्रस्ताव पाठवला नाही यासंदर्भात चर्चा करून योग्य ठिकाण कळवण्यात येईल, असे ते म्हणाले.
यानंतर शहर पोलिस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या बोलताना म्हणाले, मतदान केंद्रावर आवश्यक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी दिवशी सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. स्ट्रॉंग रूमसाठी कडेकोट सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. प्रचारासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सल्ला आणि सूचना देण्यात आल्या आहेत. एनसीसी संघांची नेमणूक करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी आणि आरपी ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगत समारंभांना परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल, याची काळजी घेण्यात येईल, असे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, गणेश चौगुला, अभय अवलक्की यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments