Vijayapura

फळांच्या राजाचे’ दर गगनाला!

Share

फळांचा राजा असलेल्या आंब्याचे दर हंगाम सुरु होऊन अनेक दिवस उलटले तरीही वधारलेलेच आहेत. यंदा आंब्याच्या उत्पादनात घट झाल्याने आंब्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आंब्याचे दर अजूनही वधारलेलेच असून गोड आंब्याचा दर मात्र ग्राहकांसाठी तिखट ठरत आहे. आंबा मार्केटसंदर्भात आमचे विजापूरचे प्रतिनिधी विजयकुमार सारवाड यांनी घेतलेला विशेष आढावा पाहुयात या पुढील रिपोर्टमधून….

फळांचा राजा असणाऱ्या आंब्याला यंदा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. विजापूरमधील फळ बाजारात विविध भागातून आंबे दाखल झाले आहेत. अनेक जातीचे आंबे बाजारात दाखल झाले असूनही आंब्याचे दर मात्र जैसे थेच आहेत. गेल्या दोन वर्षात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झेलल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी यंदा आंबा पीक घेतले नाही. आणि परिणामी यंदा उत्पादन आणि आवक कमी असल्याने आंब्याचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.

विजापूरमध्ये घेतल्या जाणाऱ्या आंबा पिकाची चव पर्यटक मोठ्या हौसेने चाखतात. याचप्रमाणे आंध्रप्रदेश मधील अनंतपूर, हिंदूंपुर यासह कर्नाटकातील गौरीबिदनूर आदी भागातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणत झाली आहे. विजापूर शहर एपीएमसी मध्ये विजापूरमधील आंबा दाखल झाला आहे. मात्र या आंब्याला म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. लिलावादरम्यान मध्यस्थींकडून अत्यंत कमी दरात आंबा खरेदी करण्यात येत आहे. आणि त्यानंतर तोच आंबा वाढीव दरात विकण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. यंदाच्या आंबा मार्केटमध्ये सिंधूर आंबा ९५० रुपये प्रतिडझन, तोतापुरी आंबा ४०० ते ५०० रुपये प्रतिडझन, नाटी ज्वारी ४०० रुपये प्रतिडझन, बादामी आंबा १५०० रुपये प्रतिडझन तसेच लोणच्याच्या आंब्याचे दार ५०० ते १५०० रुपये प्रतिडझन असे आहेत.

दरवर्षी विजापूरमधील बाजारपेठेत टनांच्या हिशोबात आंबा दाखल होतो. मात्र यंदा आंब्याची आवक कमी झाल्याने आंब्याच्या दारात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक खवय्यांच्या खिशाला मात्र यंदा आंब्याच्या दरामुळेही कात्री लागली आहे.

Tags: