Belagavi

अनेक समस्यांचे आगार उज्वल नगर!

Share

बेळगाव शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर होत आहे. मात्र वर वर दिसणाऱ्या या सर्व विकासाला मात्र शहराच्या आतील भागात ग्रहण लागले आहे. अनेक उपनगरांसह शहरातील अनेक भागात नागरी सुविधांच्या नावे बोंब सुरु आहे. उज्वल नगर हा परिसर देखील यापैकीच एक आहे. या परिसरातील असुविधांमुळे येथील स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करत आहेत.

पथदीपांची दुरवस्था, गटारींचा अभाव, ड्रेनेज समस्या पाण्याची अपुरी सोय या मूलभूत सुविधांच्या अभावासह रात्रीच्या वेळी सुरु असणारा भटक्या कुत्र्यांचा हैदोस हा सारा प्रकार बेळगावमधीलच उज्वल नगर परिसरातील आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असलेले हे नगर सध्या असुविधेचे आगार बनले आहे. 

या साऱ्या असुविधांबाबत येथील स्थानिक नागरिक हैराण असून अनेकवेळा निवेदने देऊनदेखील लोकप्रतिनिधींचे दुलर्क्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. पथदीपांच्या दुरवस्थेबाबत कोणीही लक्ष दिले नाही. अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. परंतु आतापर्यंत कोणताही प्रतिसाद या समस्येसंदर्भात अधिकाऱ्यांनी दिला नाही. रात्रीच्यावेळी भटक्या कुत्र्यांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत.

बेळगाव शहरात केवळ उज्वल नगरच नाही तर अशा अनेक उपनगरांमध्ये अशाचप्रकारच्या सुविधांचा अभाव आहे. अनेक उपनगरे असुविधांचे आगार बनली आहेत. बेळगावची स्मार्ट सिटी करण्याच्या प्रयत्नात अधिकारी गुंतले आहेत. मात्र वर वर दिसणाऱ्या या स्मार्ट सिटीमध्ये आतील भागात किती असुविधा निर्माण झाल्या आहेत? नागरिक कोणत्या समस्यांचा सामना करत आहेत? याचाही विचार अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

Tags: