साखर कारखान्यावर कर्ज घेतलेल्यांमध्ये काँग्रेस, भाजप आणि जेडीएस या सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. ज्यांनी कर्जाची योग्य प्रकारे परतफेड केलेली नाही अशांना शिखर बँक परतफेडीची नोटीस देत आहे. यात कोणीही सहभागी असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल असे सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर सांगितले.

बेळगावात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर म्हणाले, कर्ज थकीत ठेवलेल्या कारखान्यांकडून वसुलीची प्रक्रिया शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सुरु केली आहे. रमेश जारकीहोळी यांच्या कारखान्याच्या कर्जाबाबत डी. के. शिवकुमार यांच्या विधानाबाबत ते म्हणाले, कर्ज घेतलेल्या सगळ्यांनाच नोटीस पाठवून कर्ज वसुली करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कर्ज घेतलेल्यांची माहिती माझ्याकडे नाही. जिल्ह्यात २४ कारखान्यांनी कर्ज घेतल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १२२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. ज्यांनी परतफेड केली नाही त्या सर्वांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. राज्य शिखर बँकेने हा विषय गांभीर्याने घेतला असून कर्जवसुलीसाठी पावले उचलण्यात आली आहेत असे त्यांनी सांगितले. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आणल्याबाबतच्या प्रश्नावर सोमशेखर म्हणाले, माझ्या एकट्यामुळे हे सरकार सत्तेवर आलेले नसून, १७ आमदारांनी भाजप सरकार सत्तेवर आणले आहे. कोण आमदार काय करतोय हे मुख्यमंत्र्याना माहित आहे. मला त्याची माहिती नाही. मला सहकार खाते दिले आहे, मी ते सांभाळत आहे. माझ्या खात्याविषयी काही अडचणी असतील तर त्या दूर करून घेत आहे. बाकीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्याबाबत ते हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतील असे सोमशेखर यांनी स्पष्ट केले.
राजकीय नेत्याच्या साखर कारखान्यांकडून विशेषतः रमेश जारकीहोळी यांच्या कारखान्याच्या कर्जाची परतफेड होत नसल्याबाबतच्या प्रश्नावर सहकार मंत्री सोमशेखर म्हणाले, काँग्रेस, भाजप, जेडीएस अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या कारखान्यांनी कर्ज घेतले आहे. काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि बंडेप्पा काशमपूर, एस. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या कारखान्यांनी कर्ज घेतले आहे. ज्यांनी त्याची परतफेड केलेली नाही त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments