कोविड काळात आणि त्यानंतरच्या काळातदेखील प्रत्येक सण आणि उत्सवांवर मर्यादा होत्या. सध्या कोविड परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याने सर्वठिकाणी मोठ्या उत्साहात सण उत्सव आणि यात्रा महोत्सवांना बहर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील दाश्याळ या गावात ग्रामदैवत श्री वीरांजनेय यात्रा आयोजित करण्यात आली असून कोविड नंतर भरवल्या जाणाऱ्या या यात्रेत भाविकांचा अपूर्व उत्साह पाहावयास मिळत आहे.
तीन दिवस सलग विविध कार्यक्रम, स्पर्धांच्या माध्यमातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून बैलगाडी शर्यत, स्लो सायकलिंग, मोटार स्पर्धा, ट्रॅक्टर रिव्हर्स चालविणे, संगीत खुर्ची, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा अशा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून यात्रेला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अनेक भाविकांनी ताकाचे वितरण करून इतर भाविकांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा दिला. 
विशेष अशी परंपरा असलेल्या या यात्रेचे आकर्षण म्हणजे येथील बैलगाडी स्पर्धा. या स्पर्धेला यंदाही परंपरेप्रमाणे सुरुवात करून मोठ्या उत्साहात स्पर्धकांनी सहभाग घेतला. या गावची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी यात्रा आयोजकांनी अनेक पारंपरिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.


Recent Comments