Chikkodi

उगारखुर्दची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरु

Share

कृष्णा नदीतीरावरील उगारखुर्दची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भक्तिभावाने, उत्साहात सुरु आहे. यात्रेनिमित्त देवीच्या मूर्तीला अभिषेक अन्य धार्मिक विधी करण्यात आले.

गेली २ वर्षे कोरोना महामारीमुळे उगारखुर्द महालक्ष्मी देवीची यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. २०१९मध्ये कृष्णा नदीतील पाणी आटल्याने भाविकांना नदीत पुण्य स्नान करून दंडवत घालताना अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र यंदा नदी भरून वाहत आहे आणि कोरोनाचा कहरही कमी झाला असल्याने भाविक उत्साहाने यात्रा साजरी करत आहेत. आज, मंगळवारी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार राजू कागे, अध्यक्ष दादोबा घोरुशे, कमिटीचे सदस्य, पुजारी आणि भाविकांच्या उपस्थितीत पूजा करून सवाद्य पालखी मिरवणुकीला चालना देण्यात आली.

मंदिरापासून निघालेली ही पालखी मिरवणूक विविध मार्गांवरून फिरू कृष्णा नदी तीरावर नेण्यात आली. तेथे पुजाअर्चा करून पालखी परत मंदिरात आणण्यात आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी पालखीचे स्वागत करून पूजा केली. उगार साखर कारखान्याच्या शिरगावकर बंधूंनी महालक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी सुमारे ३१ किलो वजनाची चांदीची चौकट बनवून दिली आहे. त्या चौकटींचीही यावेळी पूजा करण्यात आली.

पालखी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी माजी आ. राजू कागे, दीपक पाटील, राकेश पाटील, प्रफुल्ल घोरुशे, सुरेश वाघमोडे, मुख्याधिकारी सुनील बबलादी आदींनी परीश्रम घेतले. यात्रेचा उद्या, बुधवार मुख्य दिवस आहे. यानिमित्त सकाळपासून महापूजा, अभिषेक, नैवेद्यार्पण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे जनावरांचे प्रदर्शन, कबड्डी स्पर्धा, घोडा गाड्यांची शर्यत तसेच विविध क्रीडास्पर्धा होणार आहेत.

Tags: