Belagavi

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती आढावा बैठक

Share

शेतकर्‍यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात यावा. कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यामुळे बँकेची पतदेखील सुधारेल, असे मत सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी व्यक्त केले.

डीसीसी बँकेच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत बोलताना मंत्री एस टी सोमशेखर म्हणाले, डीसीसी बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, जिल्ह्यातील २१ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वितरणात बेळगाव जिल्हा अग्रस्थानी असल्याचे ते म्हणाले. कोविड काळात डीसीसी बँकेने महत्वपूर्ण भूमिका बजावली असून संकटकाळात देखील मुख्यमंत्री मदतनिधीतून २ कोटी रुपये देण्यात आले आहेत, याचप्रमाणे कोविड रुग्णांना २ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चातून चिक्कलगुड्ड गावात ऑक्सिजन युनिट स्थापन केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील केले.

सहकार मंत्री पुढे म्हणाले, अल्प मुदतीच्या कर्जमाफी योजनेत एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. आत्मनिर्भर कार्यक्रमांतर्गत कृषी पायाभूत सुविधा विकास निधी आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय सेवा केंद्रात रूपांतर करण्याची प्रगती झाली आहे. बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध प्रकारच्या कर्ज सुविधा बँकेत उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांनी सहकार क्षेत्रात सहकार्याची भावना ठेवून जनतेला सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य वर्गाला विविध अनुदानित कर्जे उपलब्ध करून देण्यात येतात, याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. डीसीसी बँकेने कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि पात्र शेतकऱ्यांना पत सुविधा देऊन जनतेची अधिक चांगली सेवा केली पाहिजे असे आवाहन देखील एस टी सोमशेखर यांनी केले. आवास योजनेसह विविध अनुदान योजना डीसीसी बँकेला मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करावा. तसेच बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज देण्यात यावे. अल्पमुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कृषी कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोने तारण कर्ज, कर्मचारी गृह कर्ज, गृह कर्ज (सामान्य) वेतन कर्ज आणि गृह तारण कर्ज यांना उच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे मंत्री सोमशेखर यांनी सांगितले.

या बैठकीला डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुभाष ढवळेश्वर, सहकार विभागाचे अपर निबंधक दिवाकर, संचालक मंडळ, सभासद आणि अधिकारी उपस्थित होते.

Tags: