माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौऱ्यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मंगल गोगटे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत चंदगडचे राष्ट्रवादीचे आ. राजेश पाटील, कर्नाटक विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

आज दुपारी ४ वाजता अंकली येथे होणाऱ्या चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची कोनशिला शरद पवार यांच्याहस्ते बसविण्यात येणार आहे. त्यानंतर अंकली येथे वीरराणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्याहस्ते होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सोसायटीचे लोकार्पण, ६ वाजता केएलई संस्थेच्या शारदादेवी कोरे कॉलेजच्या आवारात जाहीर सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत. रात्री ९ वाजता बेळगावला परतून रात्री बेळगावातच वास्तव्य करणार आहेत. उद्या, बुधवारी सकाळी बेळगावातील मराठा को ऑप बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात शरद पवार भाग घेणार आहेत.

त्यानंतर सकाळी ११ वाजता दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सव समारंभात ते भाग घेणार आहेत. दुपारी १ वाजता केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजता सांबरा विमानतळावरून ते पुण्याला रवाना होणार आहेत.


Recent Comments