Chikkodi

चिक्कोडीत कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचा मेळावा

Share

मुख्यमंत्री झाल्याच्या 24 तासांच्या आत मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2 प्रवर्गात समावेश करण्याचे असा शब्द दिलेल्या येडियुरप्पानी आपल्याच आश्वासनाला हरताळ फासला आहे अशी टीका कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी केली

चिक्कोडीजवळील टांग्यानखोडी येथे अनिल माने यांच्या शेतात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या मेळाव्यात सहभागी होऊन बोलताना परिषदेचे राज्याध्यक्ष शामसुंदर गायकवाड म्हणाले, मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2 ए प्रवर्गात समावेश करण्यात सरकार विफल ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी परिषदेने सरकारकडे केली होती. ती पूर्ण करण्यात आली आहे. राज्यात 75 आमदार निवडून आणण्याची ताकद मराठा समाजात आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर जेथे मराठा समाजाचे प्राबल्य आहे तेथे मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून भाजपला चांगला धडा शिकविण्यात येईल असा इशारा गायकवाड यांनी दिला.

माजी आमदार मनोहर कडोलकर यावेळी म्हणाले, राजकीय पक्षांनी मराठा समाजाला हिंदुत्वाच्या विषयावरून भावनिक आवाहन करून त्यांचा वापर करून घेणे खेदजनक आहे. मराठा समाजाने संघटित होऊन लढा दिल्यास सरकार कोणतेही असो, समाजाच्या मागण्या मान्य करवून घेऊन सुविधा मिळवता येतील असे सांगितले.

यावेळी बोलताना भाऊसाहेब जाधव म्हणाले, मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या संघटित होण्याची गरज आहे. मराठा विकास महामंडळाला सरकारने केवळ 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो समाजाच्या विकासाला पुरेसा नाही. कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या 55 लाख आहे. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांना पुन्हा मंत्रिपद दिले नाही तर भारतीय जनता पक्षाला आगामी काळात चांगला धडा शिकविण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिला.

यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी अनिल माने यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष रामा माने, बाळासाहेब पाटील, ऍड. बी. आर. यादव, सुमित्रा उगळे, विनायक देसाई आदी उपस्थित होते.

 

Tags: