Belagavi

यंदा 10 दिवस आधी येणार मान्सून ! 20 ते 21 मे दरम्यान अंदमानात, 11 जून पर्यंत मुंबईत

Share

यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वात आधी मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो, त्यानुसार आगामी 20 ते 21 मे दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंदमाननंतर भारतात सर्वात आधी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. या अंदाजानुसार सर्व काही व्यवस्थित राहिले तर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे त्यानंतर 7 दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. म्हणजेच तळकोकणात मान्सून 7 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तर 11 जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.

का लवकर दाखल होणार मान्सून ?

बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या वातावरणीय बदलांमुळे यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासंदर्भात ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने आपला अंदाज जाहीर केला आहे. गेल्या वर्षी देखील मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. यंदा देखील अडचण आली नाही तर, मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सामान्य पाऊस पडला तरी शेतकऱ्यांना फायदा होईल.

भारतात मान्सूनची वाटचाल

भारतामध्ये शेती आधारीत उद्योग मान्सूनवर अवलंबून आहेत. भारतातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी जवळपास 40 टक्के पेरणी क्षेत्र हे पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. भारतीय हवामान विभागाने अद्याप भारतातील मान्सूनची वाटचाल जाहीर केली नसली तरी यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्‍यता पाहता लवकरच या संबंधीचा अंदाज व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.

Tags: