Khanapur

जांबेगाळी गावातील ‘रुफीयात क्लिनिक’ला टाळे

Share

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील जांबेगाळी गावात आरोग्य खात्याच्या पथकाने फिल्मी स्टाईलने छापा टाकून बोगस डॉक्टरवर कारवाई करून त्याच्या दवाखान्याला टाळे ठोकले.

होय, खानापूर तालुक्यातील जांबेगाळी गावातील ‘रुफीयात क्लिनिक’ला आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी टाळे ठोकले. अधिकृत प्रमाणपत्र नसताना तसेच आरोग्य खात्याचे परवानगी न घेता रफिक हलशीकर हा बोगस डॉक्टर हा दवाखाना चालवीत होता. क्लिनिक चालविण्यासाठी परवानगी घेणारा वेगळा आणि तो चालविणारा वेगळा असे या कारवाईत आढळून आले. छाप्यावेळी दवाखान्याला बाहेरून कुलूप घातला होता, मात्र आत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले. आरोग्य खात्याच्या व कोणाच्यानिदर्शनाला येऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.

मात्र आरोग्य खात्याच्या पथकाने तेथे छापा टाकून अखेर ही कारवाई केलीच. वारंवार दरवाजा ठोठावून देखील आतून कोणी प्रतिसाद दिला नाही, किंवा कोणी कुलूप काढले नाही. त्यामुळे पथकाने फिल्मी स्टाईलने जिन्यावरून पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत उतरून कुलूप काढण्यास सांगितले. त्यावेळी आतून रुग्णांना लपविण्याचा प्रयत्न झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर कडी काढायला लावण्यात पथकाला यश आले. पथकाने आत जाऊन पाहताच परवानगी घेतलेला डॉक्टर नसल्याचे व भलताच कोणी रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. शिवाय त्याठिकाणी औषधांचा ढीग आढळून आला. त्यामुळे आरोग्य अधिकारीही चक्रावून गेले. त्यांनी संबंधितांकडून माहिती घेतली. आता यावर ते काय कारवाई करतात हे पहावे लागेल. 

या बोगस डॉक्टरांवरील कारवाईत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, केपीएमई नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसन्नवर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सूनधोळी, खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे, डॉ. मंजुनाथ बिस्नोळ्ळी आदींनी भाग घेतला.

 

 

Tags: