डॉ. बी आय आंबेडकर यांनी संत बसवेश्वर महाराजांच्या तत्वानुसार भारताची राज्यघटना लिहिली, असे मत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग तसेच महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जगज्योती संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत बसवेश्वर यांच्या मूर्तीला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.
बसवेश्वर गार्डन येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, बसवेश्वर महाराजांच्या तत्वांचे अनुसरण आजच्या तरुण पिढीने करणे हे अत्यावश्यक आहे. संत बसवेश्वरांच्या तत्त्वांमुळे उत्तम समाज निर्मितीला मदत होऊ शकते. १२ व्या शतकात समानतेच्या विचारांनी आंदोलन, संघर्ष करत समाजसुधारणा करणाऱ्या संत बसवेश्वरांचे विचार, तत्वे आजतागायत अमर आहेत. त्यांच्याच तत्वांवर आधारित भारताची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, असे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बालपणी गायिलेल्या बसवेश्वर महाराजांच्या वचनांवर आधारित गाण्याला उजाळा देत सर्वांसमोर गाण्याचे सादरीकरण केले.
यावेळी विशेष व्याख्याते म्हणून साहित्यिक डॉ. सी के नावलगी उपस्थित होते. शुभा तेलसंग आणि प्रतिभा कळ्ळीमठ , रोहिणी के एम आणि अंध कलाकार बसाप्पा अंगडी यांनी वाचन गायन सादर केले. कार्यक्रमास शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी बोरलिंगय्या, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, रत्नप्रभा बेल्लद, शिवनगौडा पाटील, ज्योती भाविकट्टी, आर पी पाटील, रमेश कळसन्नवर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments