Belagavi

बेळगावात शिवजयंती उत्सवाला उत्साहात प्रारंभ

Share

 बेळगावात शहराच्या परंपरेनुसार वैशाख द्वितीयेच्या दिवशी आज, सोमवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गल्लोगल्ली मंडपात शिवपुतळ्यांचे पूजन, शिवरायांचे प्रेरणादायी पोवाडे यांनी संपूर्ण वातावरण भगवे, शिवमय झाले आहे.

: होय, रविवारी रात्रीपासूनच ठिकठिकाणच्या गड-कोटांवरून शिवप्रेमींनी आणलेल्या शिवज्योती आणि मशालींच्या तेजाने माहोल उजळून निघाला. शिवरायांच्या या मावळ्यांनी आणलेल्या  शिवज्योतीचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले.सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची पावले शहापूरातील छत्रपती शिवाजी उद्यानाकडे वळली होती. शिवज्योत आणलेल्या शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानातील शिव पुतळ्याला अभिषेक करून, पुष्पहार घालून, प्रार्थना करून शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या उपस्थितीत आ. अनिल बेनके यांच्याहस्ते शिवपुतळ्याचे पुष्पहार घालून विधिपूर्वक पूजन करण्यात आले.

त्याचप्रमाणे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवपुतळ्याचे पुष्पहार घालून विधिपूर्वक पूजन करण्यात आले.यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना दीपक दळवी म्हणाले, वैशाख शुद्ध द्वितीयेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची बेळगावची परंपरा आहे. त्यानुसार आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. बुधवारी यानिमित्त शिवरायांच्या जीवनावरील आधारित प्रसंगांचे सजीव देखावे असलेली चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. युवा पिढीला शिवरायांचा आदर्श, विचार आणि इतिहास समजावून सांगण्यासाठी काढल्या जाणाऱ्या या मिरवणुकीत युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी बेळगाव शहर व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: