Bailahongala

पाणी योजना पूर्ण करेन; अन्यथा जेडीएसचे विसर्जन करेन : कुमारस्वामी

Share

पूर्ण बहुमत दिल्यास वर्षांत राज्यातील सर्व पाणी योजना पूर्ण करेन, हा शब्द पाळला नाही तर जेडीएसचे विसर्जन करेन असा दावा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलमध्ये  जनता जलधारे कार्यक्रमात ते बोलत होते.

जनता जलधारे कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी शुक्रवारी सायंकाळी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात दाखल झाले. यावेळी जेडीएस कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी त्याचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करून कार्यक्रमस्थळी मिरवणुकीने नेले. डोक्यावर कलश घेतलेल्या महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी शहरातील राणी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर ते वाहनाने कार्यक्रमस्थळी रवाना झाले तर जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी स्वतः बैलगाडी हाकत कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

त्यानंतर भव्य व्यासपीठावर कुमारस्वामींसह मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने जनता जलधारे कार्यक्रमाचे उदघाटन केले.  त्यानंतर बोलताना कुमारस्वामी म्हणाले, 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला पूर्ण 5 वर्षे सत्ता दिली तर राज्याच्या सर्व पाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देत, जर माझा शब्द मी पाळला नाही तर जेडीएसचे विसर्जन करून टाकेन असा दावा केला. गेल्या निवडणुकीत मी शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करेन असे आश्वासन दिले होते.मात्र आमच्या पक्षाला बहुमत दिले नाही. कुमारस्वामी कर्ज माफ करणार नाहीत, सत्तेवर येणार नाहीत अशी आवई विरोधकांनी उठवली. परंतु काही बदल होऊन काँग्रेस आमच्या घरात शिरली. मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करू असे आमच्या देवेगौडा यांनी सांगितले होते. पण त्यांनी ते मानले नाही.    त्यामुळे कर्जमाफी करणार नाहीत असे म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो. शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले असे ते म्हणाले.

गेल्या २ वर्षांत अतिवृष्टीने, महापुराने घरे गमावलेल्या पीडितांना भरपाई देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून कुमारस्वामी म्हणाले, भाजप सरकारने पूरपीडितांना ५ लाख रुपये भरपाई घोषित केली. मात्र अजूनदेखील भरपाईचा एक पैसाही पीडितांना मिळालेला नाही. त्यांउळे त्यांचे संसार रस्त्यावर आले आहेत अशी टीका त्यांनी केली. राज्यातील भाजप सरकारच्या ४०% कमिशनच्या धोरणावर सडकून टीका करत कुमारस्वामी म्हणाले, राज्यात ४०% कमिशनची जोरदार चर्चा सुरु आहे. हे पैसे जनतेचे आहेत. मी ४८ हजार कोटींचे कर्ज माफ केले. त्यांच्याप्रमाणे कमिशन घेत गेलो असतो तर १० हजार कोटी रुपये सहज कमावू शकलो असतो. पण आमची संस्कृती वेगळी आहे. म्हणून तुमची मते विकू नका, आजच ‘आमची मते विकणार नाही’ असा बोर्ड तुमच्या दारात लावा असे आवाहन कुमारस्वामींनी केले.

यावेळी जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: