Vijayapura

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

Share

राज्यात झालेल्या पीएसआय परीक्षा घोटाळ्यानंतर अनेक राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली असून सत्ताधारी पक्षातील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राज्यातील सरकार विरोधात पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

राज्यात पार पडलेल्या पीएसआय परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत असून विजापूर येथील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी थेट पंतप्रधान कार्यालयात या संदर्भात तक्रार केली आहे. पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करत त्यांनी तक्रार केली असून या तक्रारीची पोचपावती ही त्यांना ऑनलाइन मिळाली आहे.

या तक्रारीत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून राज्यातील भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप देखील केला आहे. पोलीस विभागासह अनेक विभागात राज्यात गैरव्यवहार सुरू असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. राज्यात झालेल्या पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्याची विनंती देखील या तक्रारीत करण्यात आली आहे.

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या माध्यमातून हिंदू संघर्षक स्वामी विवेकानंद युवा सेनेचे अध्यक्ष राघू अन्नीगेरी यांनीही पंतप्रधान कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

पीएसआय परीक्षा प्रकरणी दिव्या यांना आरोपी ठरविण्यात आले असून दिव्या यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हे सीबीआय प्रकरण खूप मोठे असून राज्यातील अनेक भाजप नेत्यांचा यात सहभाग असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. केवळ पोलिस खात्यातच नाही तर सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागात देखील भ्रष्टाचार सुरू आहे. या संदर्भात अनेक तक्रारी ऐकण्यात आल्या असून या घडामोडींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Tags: