Hukkeri

दड्डी ग्रामसभेस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती : ग्रामस्थांचा संताप

Share

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी मतदार संघातील दड्डी गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला कृषी अधिकारी वगळता कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नसल्यामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते. मात्र सभेला अधिकारी अनुपस्थित राहिले तर आपल्या समस्या कशा सुटणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. दरम्यान नोडल अधिकाऱ्यांनीही सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.या सभेला कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आपल्या समस्या कुणाला सांगायच्या असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. २० दिवसांनी पुन्हा सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला अधिकारी गैरहजर राहिले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामपंचायत व्यपातीत येणाऱ्या अंगणवाडीला आणि प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य देण्यासाठी मार्च २०२१ मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या कंत्राटदाराच्या नावे घेण्यात आलेल्या निधीत देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. शिवाय या घोटाळ्यात तालुका अधिकारीही सहभागी असून त्यांना यासंदर्भात विचारणा करण्यात येईल यासाठीच ते या सभेला अनुपस्थित राहिले, असा आरोपदेखील ग्रामस्थांनी केलाय. दड्डी ग्राम पंचायतीचे अधिकारी गावात येत नसून गावातील कागदपत्रांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा त्यांची बदली करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.ग्राम पंचायत विकास अधिकारी प्रशांत मुन्नोळ्ळी यांनी सांगितले, कि ग्रामसभेसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे मात्र अधिकारी अनुपस्थित राहिले, यात मी काय करू शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या नरेगा कामकाजासंदर्भात संदीप माने यांनी दड्डी गावात क्रीडांगणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष मेहुदीन शेख, नोडल अधिकारी श्रीशैल कांबळे, पीडीओ प्रशांत मुन्नोळ्ळी उपस्थित होते.

Tags: