विश्वगुरू बसवण्णांची वचने आपल्या संविधानाला पूरक आहेत. जाती–धर्माच्या भिंती दूर करून सर्व लोकांना समानतेच्या प्रवाहात त्यांनी आणले. बसवण्णा हे संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत असे विचार जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मांडले.

बेळगावातील लिंगायत संघटनेतर्फे रामतीर्थ नगरात आयोजित बसव बेळवी येथील चिरंतेश्वर मठाचे प्रसिद्ध प्रवचनकार श्री शरण बसव अप्प यांच्या प्रवचन कार्यक्रमात भाग घेऊन बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, बसवण्णा यांचे विचार, तत्वं आपल्या राज्यघटनेशी सुसंगत आहेत. आमच्या पूर्वजांनी, शरण साहित्यकारांनी जीवन सुंदर करणारी अनेक वचने लिहून ठेवली आहेत.
त्यांचे सर्वांनी अनुकरण केले पाहिजे. जाती-धर्माच्या भिंती पाडून सर्व समुदायाच्या लोकांना एकत्र आणून मानवधर्म हाच श्रेष्ठ धर्म आहे असा संदेश देणारे बसवण्णा संपूर्ण जगाला आदर्श आहेत. संस्कृती निर्माण करणे हाच सर्व धर्मांचा उद्देश आहे. आसक्ती, दुष्कृत्यांपासून दूर राहण्याचा संदेश सर्व धर्म देतात. त्याचे पालन आपण केले पाहिजे. आपली वाणी, कृती सरळ ठेवून समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
याप्रसंगी प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगण्णावर, लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयेन्नावर, पदाधिकारी शंकर गुडस, सदाशिव देवरमणी, बसवराज वजेन्नावर, चंद्रकांत मणगुत्ती, संगमेष अरळी, विजय हुदलीमठ, शिरगुप्पी शेट्टरु, शशिभूषण पाटील. सुरेश पाटील, अशोक इटगी, शंकर शेट्टी, सुरेश नरगुंद, सुरेश उरबिनट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments