राज्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा निषेध करत बेळगाव शहरात युथ काँग्रेसच्यावतीने भव्य आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथून सुरु झालेल्या निषेध मोर्चात बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण भाग यासह जिल्ह्यातील अनेक भागातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. या मोर्चात महम्मद नलपाड यांच्या नेतृत्वाखाली अनेक भागातून सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाची सुरुवात कॅम्प परिसरातील उभ्या मारुती मंदिरात पूजेने करण्यात आली. कॅम्प उभा मारुती पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला काँग्रेस नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडविले. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळाली. महम्मद नलपाड यांनी आपल्याला अटक करा परंतु आपण जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार असा पवित्रा घेतला. ४० टक्के कमिशन मिळविणाऱ्या सरकारविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात यावे, असा आग्रह करत जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महम्मद नलपाड बोलताना म्हणाले, भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. अशा भ्रष्टाचारी सरकारला तरुण पिढी कंटाळली आहे. याविरोधात आज सर्व तरुण कार्यकर्त्यांना घेऊन निषेध रॅली काढण्यात आली असून संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी भाजप सरकार दोषी असल्याचे सांगत आणखी किती जणांचा बळी भाजप सरकार काळात होणार असा संतापजनक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी केंद्राच्या दरवाढीच्या धोरणाचाही तीव्र निषेध करण्यात आला. भाजप सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात एखाद दुसऱ्या रुपयांची वाढ झाली तर याच भाजप सरकारमधील नेत्यांनी सिलिंडर हातात धरून निदर्शने केली. परंतु सत्तेवर आल्यानंतर किंमती गगनाला भिडून देखील चकार शब्द काढत नसून आपले अपयश झाकण्यासाठी भाजप सरकार जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
भाजप सरकारच्या काळात मठांना देण्यात येणाऱ्या अनुदानातील ३० टक्के कमिशनसंदर्भात देखील नलपाड यांनी आक्षेप घेत भाजप सरकारवर निशाणा साधला. अशा कमिशन घेणाऱ्या सरकारमुळे युवक कंगाल झाले असून अशा सरकारला पाडण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे ते म्हणाले.
भाजपकडून मुस्लिम धर्मियांना करण्यात येणाऱ्या टार्गेट संदर्भात प्रतिक्रिया देताना नलपाड म्हणाले, आपण कोणत्याही जाती धर्मापुरते सीमित नाही. आम्ही सारेजण भारतीय आहोत. जन्म घेण्याआधी विशिष्ट जाती धर्माचा अर्ज भरून आपण जन्माला आलो नाही. भाजपकडून एकाच धर्माला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या मोर्चात सहभागी झालेल्या राहुल जारकीहोळींनी देखील आपले मत व्यक्त केले. राज्यात भाजप सरकार भ्रष्ट्राचार करत आहे. याला बेळगावमधील एक तरुण कंत्राटदार बळी पडला असून भाजप सरकार अपयशी असल्याची टीका त्यांनी केली. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली असून याचा फटका गरीब आणि सर्वसामान्यांना बसत असून अशा भ्रष्ट सरकारवर कारवाई झाली पाहिजे, असे मत जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
या मोर्चात यवा नेते राहुल जारकीहोळी, मृणाल हेब्बाळकर, युवा काँग्रेस बेळगाव जिल्हा अध्यक्ष कार्तिक पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष यल्लाप्पा शिंगे, बेळगाव शहर युवा काँग्रेस अध्यक्ष सैफ सेठ, बेळगाव शहर युवा काँग्रेस उपाध्यक्ष पवन राठोड, यासीन अंकलगी आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments