Davanagere

पीएसआय भरती प्रकरण : कुणाचीही गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री

Share

राज्यात पीएसआय नेमणूक प्रकरणावरून भाजप सरकार पुन्हा पेचात पडले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणात सहभागी असलेल्यांची गय न करता कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.

पीएसआय भरती प्रकरणात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला असून या प्रकरणात कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचा हात असो त्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास करून अटक करण्याचा आदेश देण्यात आला असून असे घोटाळे कदापि सहन केले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दावणगेरे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात उघडकीस आलेले पीएसआय भरती प्रकरण आणि यासंबंधीच्या तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तळाशी आपण पोहोचणार असून सध्या प्राथमिक तपासावर आधारित सीआयडी तपास करण्यात येत आहे.

अशा घोटाळ्यांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत आहे का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंतरू म्हणाले. हा प्रश्न सरकारचा नाही. यूपीएससी वर आधारित परीक्षा घेण्यात आल्या. मात्र काहींच्या विकृत प्रवृत्तींमुळे असे प्रकार घडत आहेत. या गोष्टींवर सरकार चौकशी करत असून आमच्या सरकारमध्ये प्रामाणिक, कायदेशीर व्यवहारांना जागा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आज रात्री मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या संपूर्ण दिवस मुख्यमंत्र्यांची कॉन्फरन्स असून प्रधानमंत्री आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधिशांसमवेत हि कॉन्फरन्स होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होण्याची शक्यता कमी असून यासंदर्भात कोर कमिटी आणि पार्लिमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी भाषावार प्रांतरचनेसंदर्भातदेखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून प्रादेशिक भाषा हीच सार्वभौम भाषा असून कर्नाटकार कन्नड हि भाषा सार्वभौम भाषा असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात भाजप सरकार अनेक घोटाळ्यांच्या कात्रीत सापडत असून एकामागून एक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. सीडी प्रकरण, कंत्राटदारांचे कमिशन प्रकरण, मठांना देण्यात येणारे कमिशन प्रकरण धार्मिक दंगली आणि त्यानंतर आता पोलीस भरती प्रकरणी विरोधकांनी भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या पक्षाच्या सरकारात प्रामाणिक आणि कायदेशीर गोष्टींना वाव असून घोटाळा, भ्रष्टाचार प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Tags: