राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की फेररचना हे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्यावरच स्पष्ट होणार आहे असे जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.

बेळगावात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून येणार आहेत. वरिष्ठांशी चर्चेनंतर ते काय निर्णय घेता हे पाहू. मंत्रिमंडळाचा विस्तार तर होईल किंवा फेररचना होईल. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो ते चालवतील. ५ जणांना उपमुख्यमंत्री करणार ही केवळ एक अफवा आहे, त्यावर पक्षात काहीच चर्चा झालेली नाही असेही मंत्री कारजोळ यांनी स्पष्ट केले.
हिंदीच्या वापरावरून सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री कारजोळ म्हणाले, कसला वाद वगैरे काहीच नाही. देशात ज्या-त्या राज्याची स्वतःची मातृभाषा आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात कन्नड आमची मातेसमान मातृभाषा आहे. 2500 वर्षांपासून या राज्यात कन्नडच्या संवर्धनासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत कन्नड भाषा टिकून राहील. आमच्यावर परकीयांनी 600 वर्षे राज्य केले. ब्रिटिश, मोगल, पोर्तुगीज अशा अनेकांनी येथे राज्य केले. तरीही कन्नड भाषा, हिंदू धर्म नष्ट करणे कोणाला जमले नाही. हिंदू धर्म आणि मातृभाषा कायम टिकून राहील असे कारजोळ यांनी सांगितले.
एकंदर मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दिल्ली भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होतो की फेररचना हे पहावे लागेल.


Recent Comments