हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा पातळीवर साजरी करण्यात आली.

होय, अनुसूचित जाती-जमाती जनसेवा संघातर्फे हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा पातळीवर साजरी करण्यात आली. कोल्हापूरचे भंते बी. आर. आनंद, म्हैसूरचे ज्ञानप्रकाश स्वामीजी, बेळवीचे शरण बसव स्वामीजींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘महानायक’ या मालिकेतील आंबेडकरांची बालपणातील भूमिका साकारलेला बालनट आयु भानुशाली बुद्ध यांच्याहस्ते बसव, बुद्ध, आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना नसती तर आज आपल्याला जगणेच कठीण झाले असते. बाबासाहेबानी सर्वसमावेशक घटना लिहील्यानेच आपल्याला आपले हक्क मिळाले आणि आपण सुखाने जगत आहोत. सुलतानपूरचे दलित नेते सुरेश तळवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत असे जारकीहोळी म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांना चांदीच्या रथातून कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. निवृत्त प्रा. डी. श्रीकांत, गुरप्पा तळवार, रमेश हुंजी, शिळा पाटील, सहदेवी तळवार, बसवराज खडकभावी आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले, आंबेडकर आकाशातून आपल्याकडे पहात आहेत अशा भावनेने त्यांचा प्रत्येक विचार आपण आचरणात आणण्याची गरज आहे.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध दलित संघ-संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सुरेश तळवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments