स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खानापूर येथे तालुकास्तरीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले. शिबिराच्या उदघाटनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

खानापूर येथील शिवस्मारक चौकापासून तालुका सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रांगणापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मिरवणुकीचे उदघाटन केले. यावेळी सर्व ग्रामीण बाजाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित व्यासपीठावर मान्यवरांनी गणेशाला पूजन केले. त्यानंतर तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, खानापूर शासकीय रुग्णालयाचा विस्तार करून तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यात येईल. सध्याचे १०० खाटांचे हॉस्पिटल नवीन अत्याधुनिक बेडसह बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
मंजुरीच्या अंतिम टप्प्यात हे काम आहे. हे इस्पितळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत परिवर्तन आणेल असा विश्वास आ. निंबाळकर यांनी व्यक्त केला. पुढे बोलतांना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या या आरोग्य यंत्रणेचा कणा असून माता व अर्भकांचे आरोग्य व कुपोषण कमी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोरोना संकटात त्यांनी चांगले काम केले आहे.
मलेरिया, डेंग्यू आणि क्षयरोग यासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. खानापूर तालुक्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करून केवळ साडेतीन हजार लोकांना आरोग्य कार्ड देण्यात आल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ.संजय नांद्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एबीआरके कार्ड साडेतीन हजार ओपीडी कार्ड, नेत्रदानासाठी ६० नेत्रदात्यांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय मलेरिया दिवसही पाळण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी यावेळी आरोग्य कार्ड व आयुष्मान भारत हेल्थ कर्नाटक कार्डचे वाटप करण्यात आले व आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती जनतेला देण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन, डॉ. संजय डुमगोळ , डॉ. पवना पुजारी, डॉ. मंजुनाथ दलवाई, डॉ. तसनीम बानू, डॉ. विकास पै, डॉ. रमेश पाटील, डॉ. सलीमा नदाफ, डॉ. पूजा तसेच आरोग्य व अन्य खात्यांचे तालुकास्तरीय अधिकारी, नागरिक उपस्थित होते.


Recent Comments