उन्हाळी ऋतूत भल्या सकाळीच उन्हामुळे अंगाची लाही होत असताना जरासा गारवा घ्यावासा वाटणं यात गैर नाही. सध्या बेळगावमधील अनेक स्विमिंग पूल गर्दीने तुडुंब भरत असून उन्हाच्या झळांपासून मुक्ती मिळविण्यासाठी मुलांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

गरिबांचे महाबळेश्वर म्हणून परिचित असलेल्या बेळगावमध्ये दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. उन्हाच्या असह्य झळांपासून सुटका मिळविण्यासाठी मुलांनी आपला मोर्चा स्विमिंग पुलकडे वळविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे स्विमिंग पूल बंद होते. मात्र यंदा स्विमिंग पूल सुरु करण्यात आल्यामुळे पूर्ण क्षमतेने स्विमिंग पूल सुरु झाले आहेत.
बेळगावमधील बसवेश्वर सर्कल नजीक असणाऱ्या मनपा जलतरण तलावात आभा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने नागरिकांसाठी स्विमिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कोणत्याही पद्धतीचे उपक्रम राबविण्यात आले नव्हते. मात्र यंदा लहान मुले, तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात जलतरण तलावात सरावासाठी येत आहेत.
आभा स्पर्ट्स क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार यांनी आमच्या वाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले, कि जलतरणपटूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभाग घेता यावा या दृष्टिकोनातून या जलतरण तलावाची रचना करण्यात आली आहे. हा पूल मोठा आहे पण अतिशय सोयीचा असा आहे. अशोक नगरसह अनेक ठिकाणी स्विमिंग पूल आहेत मात्र ते तितके लोकप्रिय नसल्याचे ते म्हणाले. या स्विमिंग पूल मध्ये अनेक बॅच घेण्यात आल्या. बेळगावमध्ये डायव्हिंग बोर्ड सुस्थितीत नाहीत. यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत होती. आता फायबर बोर्ड आल्याने मुलांना या स्विमिंग पूलमध्ये सोयीचे ठरत असल्याचे ते म्हणाले.
स्विमिंग पूल संदर्भात अर्चना रोहित जाधव नामक पालकांनी सांगितले कि, गेल्या २ वर्षात स्विमिंग पूल बंद असल्याने या सर्व उपक्रमांपासून मुले खूप दूर गेली आहेत. सध्या उन्हाच्या झळाही तीव्र झाल्या असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्विमिंग पूल सोयीस्कर ठरत असून मुलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. 
शहरात अनेक ठिकाणी पूर्ण क्षमतेने स्विमिंग पूल सुरु आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील स्विमिंग पूल मध्ये पोहणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. उन्हाच्या झळांपासून थोडी सुटका आणि अंगाची लाही कमी करण्यासाठी अनेकांची पाऊले स्विमिंग पूलच्या दिशेने वाटचाल करत आहेत.


Recent Comments