बेळगावात काल मध्यरात्री जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

होय, काल मध्यरात्री बेळगाव शहर आणि परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे 2च्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले. त्यासोबतच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु झाला. लख्ख चमकणाऱ्या विजांनी आकाशात जणू प्रकाशाचा खेळ सुरु झाला.
बराच काळ आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु होता. त्यासोबतच झालेल्या मुसळधार पावसाने शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. वीरभद्र नगर, शाहू नगर, गणेशपूर, कॅम्प, हिंडलगा, विजयनगर, गांधी चौक, शौर्य चौक आदी अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष मुळासकट उखडून जमीनदोस्त झाले. पाऊस-वाऱ्याच्या जोरामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वीजवाहक ताराही कोसळल्या. त्यामुळे शनिवारी सकाळी त्याचा वाहतुकीला मोठा अडथळा झाला. त्यातूनच कशीबशी वाट काढत नागरिक वाहने हाकताना दिसत होते. पावसामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.
वाढदिवस सोडून ते धावले समाजाच्या मदतीला !
दरम्यान, पावसामुळे कोसळलेल्या झाडांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आज, शनिवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी समाजसेवक साजिद शेख यांना संपर्क करून झाडे हटविण्याची विनंती केली. त्यावर साजिद शेख यांनी लागलीच आपल्या सहकाऱ्यांसह पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष असलेल्या साजिद शेख यांचा खरेतर आज वाढदिवस. त्यामुळे ते व त्यांचे कुटुंबीय बर्थ डे मूडमध्ये होते. परंतु वाहतूक पोलिसांचा फोन येताच शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समाजाच्या मदतीसाठी धाव घेत ठिकठिकाणची रस्त्यात पडलेली झाडे मशीनने हटवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करून दिले. त्यामुळे त्यांच्या या कामाची प्रशंसा होत आहे.


Recent Comments