२०१८ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे के के कोप्प येथील वृद्ध महिलेच्या घराची पडझड झाली आहे. घराच्या नुकसान भरपाईसाठी ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्याप अर्ज मंजूर करण्यात आला नसल्याने सदर वृद्ध महिला निवाऱ्याविना आपले आयुष्य कंठत आहे.

एकीकडे पडलेली भिंत. दुसरीकडे जीवाची पर्वा न करता पडक्या घरात राहणाऱ्या आजीबाई. आणखीन पाऊस पडल्यास संपूर्ण घर पडेल या भीतीने भिंतीला प्लास्टिक गुंडाळून राहणारी आजीबाई आपला जीव मुठीत धरून राहात आहे. या वृद्ध महिलेचे नाव गंगम्मा असे असून के के कोप्प या गावी ती वास्तव्यास आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घरात अद्यापही हि वृद्ध महिला रहात असून निराधार असलेल्या या वृद्ध महिलेने साहाय्याची अपेक्षा केली आहे.

बेळगाव तालुक्यातील के के कोप्प गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगम्मा हाकलदार यांचे घर कोसळले आहे. या पडझड झालेल्या घरातच नातवंडे आणि सुनेसह हि वृद्ध महिला राहत होती. घरात एकही पुरुष मंडळी नसल्याने कोणाच्याही आधाराविना हि महिला राहात आहे. ग्राम पंचायत अधिकाऱ्यांकडे घर मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला असून अद्यापही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. सदर बाब ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निदर्शनास येताच तातडीने या महिलेच्या मदतीला त्या धावल्या आहेत.

यासंदर्भात वृद्ध महिलेच्या सुनेने बोलताना सांगितले, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही अशाच पडझड झालेल्या घरात राहात आहोत. पावसामुळे पाणी घरात शिरत आहे. पावसामुळे घराच्या भिंतींची पडझड झाली आहे. घर बांधण्यासाठी प्रयत्न करणारी पुरुषमंडळी घरात नाही. घराच्या बांधणीसाठी पंचायत अधिकाऱ्यांकडे अर्ज करूनही घर मंजूर करण्यात आले नाही. अशा पडलेल्या अवस्थेत वृद्ध सासूबाई आणि मुलांसमवेत राहत असल्याचे या महिलेने सांगितले.

मागील दोन ते तीन वर्षात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीचा सामना अनेकांना करावा लागला आहे. सरकारने नुकसान भरपाईची घोषणा करूनही अद्याप अनेकांना नुकसान भरपाई मिळावी नाही. स्थानिक आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मदतीसाठी धाव घेतलीच आहे पण आमदार आणि अधिकाऱ्यांनी या वृद्ध महिलेची हि अडचण लक्षात घेऊन तातडीने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.


Recent Comments