५ राज्यांतील निवडणूक संपताच केंद्र सरकारकडून इंधन, एलपीजी दरात दररोज भरमसाठ वाढ केली जात आहे. किंमतींवर नियंत्रण नसणे हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा आरोप माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विराप्पा मोईली यांनी केला.

बेळगावातील काँग्रेस भवनात बुधवारी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विराप्पा मोईली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशाची व राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. ती सुधारण्याची गरज आहे. ५ राज्यांतील निवडणूक संपताच देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर्सचे दर दररोज वाढत आहेत. जास्त कर आकारणीमुळे किंमती वाढत आहेत. एवढा भरमसाठ कर आकारण्याची गरजच काय असा सवाल मोईली यांनी केला. काँग्रेसच्या सत्ताकाळात इंधनाच्या किंमती नियंत्रणात होत्या. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून ग्राहकांना सबसिडी दिली जात होती. ग्राहकांवर दरवाढीचा भार पडू दिला जात नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात कपात झाल्यावर त्याचा थेट लाभ ग्राहकांना दिला जात होता याची आठवण मोईली यांनी करून दिली.
पेट्रोलियम, क्रूड ऑईलचे उत्पादन आम्ही ७२% पर्यन्त वाढविले. आता ते ८२%वर पोहोचले आहे. क्रूड ऑइल साठविण्यासाठी देशात ३ ठिकाणी गोदामे केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे भाव वाढल्यास गोदामातील राखीव साठा आम्ही जनतेसाठी खुला करत असू. मंगळूर, विशाखापट्टण, उडुपी येथील गोदामातून देशभर क्रूड तेल पुरवले जात होते. सध्या इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे जनतेवर अतिरिक्त भार पडत आहे असा आरोप मोईली यांनी केला.
५ राज्यातील निवडणूक संपेपर्यंत 137 दिवस इंधन दरवाढ केंद्राने केली नाही. त्या राज्यात आपल्या पक्षाच्या विरोधात वातावरण तयार होऊ नये म्हणून ही तत्परता दाखवली. मात्र निवडणूक संपताच आपला खरा रंग केंद्र सरकारने दाखवला आहे असे सांगून मोईली म्हणाले, निवडणूक संपताच इंधन दरवाढ करून केंद्राने देशातील जनतेची फसवणूक केली आहे.
एकंदर इंधन दरवाढीवरून माजी पेट्रोलियम मंत्री विराप्पा मोईली यांनी आपल्या बेळगाव भेटीत केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला.


Recent Comments