Belagavi

संतोष पाटील कुटुंबियांना डीकेशींनी सुपूर्द केला धनादेश

Share

४० टक्के कमिशन प्रकरणी संतोष पाटील यांनी केलेल्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. यानुसार आज संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आमदार आणि नेत्यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द केलाय.

संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर ११ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन काँग्रेसने केले होते. यानुसार संतोष पाटील यांच्या बडस येथील निवासस्थानी भेट देऊन आज धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. याचप्रमाणे प्रकाश हुक्केरी यांच्यातर्फे वैयक्तिक रित्या ५ लाखांचा धनादेश संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना देण्यात आला आहे. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, महांतेश कौजलगी, अंजली निंबाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार फिरोज सेठ, काँग्रेस ग्रामीण घटकचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, नेते बाबासाहेब पाटील, महांतेश मत्तिकोप्प्प, काँग्रेस युवा घटकचे राज्याध्यक्ष महम्मद नलपाड आदींसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डीकेशी म्हणाले, संतोष पाटील यांनी पाहिलेल्या स्वप्नाचा भाग म्हणजे त्यांचे घरकुल. कनसु अर्थात स्वप्न या नावाने बांधण्यात आलेल्या घराचा गृहप्रवेश देखील अजून झाला नाही. एक धाडसी युवक, ज्याने अशापद्धतीने आपले जीवन संपविले याबाबत संपूर्ण राज्य चिंतन करत आहे. याप्रकरणाचा तपास व्हावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलन करू, संतोषवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, त्यांच्या कुटुंबियांच्या पुढील वाटचालीसाठी काँग्रेसकडून ११ लाखांची मदत देण्यात येत असून प्रकाश हुक्केरी यांनीही ५ लाखांची मदत देऊ केली आहे. हे दोन्ही धनादेश आज संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, असे डीकेशींनी सांगितले.

यावेळी डीकेशींनी संतोष पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. संतोष पाटील यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी डीकेशींनी केली आहे.

याचवेळी रमेश जारकीहोळी यांच्यावर देखील डीकेशींनी निशाणा साधत नेत्यांची यादी सांगण्यासाठी जारकीहोळी कोणता मुहूर्त आणि वेळ पाहात आहेत असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय गोकाक येथे कंत्राटदारांच्या झालेल्या बैठकीबद्दल देखील त्यांनी टोला लगावलाय.

राज्यात कोणत्याही घडामोडी घडल्या तर डीकेशींचे नाव अग्रक्रमाने जोडले जाते, या प्रसारमाध्यमांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना डीकेशी म्हणाले, काहींना माझे नाव घेतल्यानंतर शक्ती मिळते, ज्याप्रमाणे राम आणि हनुमंताचे नाव घेतल्यानंतर शक्ती मिळते त्याचप्रमाणे माझे नाव घेतल्यानंतर काहींना शक्ती मिळते, असा उपहास देखील डीकेशींनी केला.

संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंनतर काँग्रेस नेत्यांनी मुद्दा उचलून धरला आहे. शिवाय संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना आधार देण्याची ग्वाही दिली आहे. आश्वासनानुसार आज काँग्रेसतर्फे आणि प्रकाश हुक्केरी यांच्यातर्फे एकूण १६ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून सरकारला संतोष पाटील यांच्या कुटुंबाला न्याय आणि मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Tags: